Murder Mubarak Review : अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा 'मर्डर मुबारक'
Murder Mubarak Review : थ्रिलरपटाला साजेसे असलेले कथानक, कलाकारांचा दमदार अभिय आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतो.
Homi Adajania
पंकज त्रिपाठी, सारा अली खान , डिंपल कापडिया, विजय वर्मा, करिश्मा कपूर, टिस्का चोप्रा,
Netflix
Murder Mubarak Review : एखाद्याच्या चित्रपटाचे कथानक हत्येभोवती फिरत असल्यास चित्रपटात सस्पेन्स, थरार असणार याचा अंदाज येतो. कोणी हत्या केली, कोणाविरोधात काय पुरावे आहेत, हत्येचे खरं कारण काय, अशा अनेक प्रश्नांचा कानोसा प्रेक्षक घेऊ लागतात. असे चित्रपट सगळ्यांना गुप्तहेर बनवतात. असाच एक चित्रपट नेटफ्लिक्सवर आला आहे, मर्डर मुबारक! (Murder Mubarak) हा चित्रपट अखेरपर्यंत लोकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतो. चित्रपटाच्या क्लायमॅक्सपर्यंत हत्या कोणी केली, हे कळू देत नाही.
चित्रपटाची कथा काय?
एक क्लब आहे, दिल्ली रॉयल क्लब, इथे फक्त श्रीमंत लोक नाहीत, तर अतिश्रीमंत लोक इथे येतात. कोटींच्या घरात असलेले सभासद शुल्क आणि त्यावर 20 वर्षांची प्रतीक्षा यादी. या क्लबमध्ये येणारी लोक असा दिखावा करतात की मोठमोठ्या खोटारड्या, सोंग घेणाऱ्या, फेकूला ही लाज वाटली पाहिजे. या क्लबमध्ये एका जिम ट्रेनरचा खून होतो आणि मग पोलीस खून कोणी केला आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू लागतात.
आपल्या क्लबमध्ये एकाची हत्या झालीय याची पर्वा इथल्या लोकांना नाही. या उलट दिवंगत झालेल्या जिम ट्रेनरला श्रद्धांजली देण्यासाठी सोशल मीडियावर जो फोटो पोस्ट केला जाणार आहे. तो फोटो परफेक्ट आहे की नाही, याची चिंता या क्लबचा सभासदांना आहे. हे क्लब म्हणजे वेगळीच दुनिया आहे. यामध्ये लव्ह स्टोरी आहे, प्रेमाचा परमोच्च क्षण आहे, मत्सर आहे, फसवणूक आहे, छळ-कपट आहे. एका थ्रिलरपटात ज्या गोष्टी हव्यात, त्या सगळ्या यामध्ये आहे.
चित्रपट कसा आहे?
हा चित्रपट अगदी सुरुवातीपासूनच मुद्द्यावर येतो, चित्रपट पहिल्या सीनपासून उत्सुकता जागवतो, हत्येच्या तपासाबरोबरच क्लबमध्ये येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे उतरतात तेव्हा खऱ्या आयुष्यातील एक वेगळाच रंग दिसतो. लोक किती ढोंग करतात हे समजते, माणसे वागतात, जगाला दाखवतात तसे नसतात. इथे प्रत्येक वेळी आयुष्याचा वेगळा रंग दिसतो आणि तुमचा त्याच्याशी संबंध येतो, खुनाचा तपास पुढे जातो एकाच वेळी आणि खून कोणी केला हे तुम्हाला समजत नाही, हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहतो आणि हे या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
कलाकारांचा अभिनय
या चित्रपटात कलाकारांची फौजच आहे. पंकज त्रिपाठीने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका खास आपल्या शैलीत साकारली आहे. पंकज त्रिपाठी आपली छाप सोडतो. सारा अली खानने भूमिका चांगली साकारली आहे. तिच्या अभिनयाची एक वेगळीच छटा दिसते. विजय वर्माला कमी स्क्रिन टाईम दिलाय, पण कथानकाच्या दृष्टीने योग्य आहे असे वाटते. करिश्मा कपूर या चित्रपटात कमाल दिसलीय आणि तिची व्यक्तीरेखाही गजब आहे. संजय कपूर हा महाराजाच्या भूमिकेत चांगलाच दिसतोय. डिंपल कपाडियाचा एक वेगळाच अंदाज आहे. टिस्का चोप्राचे काम चांगले आहे. एकंदरीतच सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त काम केले आहे.
दिग्दर्शन कसे आहे?
होमी अदजानिया यांचे दिग्दर्शन खूप चांगले आहे, त्यांची चित्रपटावरील पकड स्पष्टपणे दिसून येते. रहस्यकथेबद्दल जी आवड निर्माण झाली पाहिजे ती निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
एकंदरीत एक चांगला रहस्यपट बघायचा असेल तर हा चित्रपट नक्की पहा.