Zwigato Review : वास्तवाची जाणीव करून देणारा कपिल शर्माचा 'झ्विगॅटो'; मात्र 'ही' कमी जाणवते
Zwigato Review : कोरोनाकाळात एका मध्यमवर्गीय कुटुंबाला कोणत्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला याचं उत्तम चित्रण 'झ्विगॅटो' या सिनेमात करण्यात आलं आहे.
नंदिता दास
कपिल शर्मा, शहाना गोस्वामी
Zwigato Movie Review : कपिल शर्मा (Kapil Sharma) एक उत्तम विनोदवीर आहे हे सर्वांना माहिती आहे. तर दुसरीकडे नंदिता दास एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. छोट्या पडद्यावर सर्वांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा रुपेरी पडद्यावर गंभीर भूमिका साकारेल असं कोणाला वाटलं नव्हतं. पण विनोदाचा बादशाह असलेल्या कपिल शर्माने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'झ्विगॅटो' या सिनेमात डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे.
'झ्विगॅटो' या सिनेमाचं कथानक काय आहे?
'झ्विगॅटो' हा सिनेमा एका डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात कपिल शर्माने मानस सिंह नामक एका डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. खरंतर मानस एका फॅक्टरीचा मॅनेजर असतो. पण कोरोनाकाळात नोकरी गमावल्यामुळे तो डिलिव्हरी बॉयचं काम करतो. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मानसची पत्नी प्रतीमादेखील काही छोटी-मोठी कामं करते.
आजारी असलेली आई, पत्नी आणि दोन मुलं यांची जबाबदारी मानसवर असते. त्यामुळे त्याची पत्नीदेखील त्याला मदत करायचं ठरवते. आवडीचं काम करत नसल्याने मानसला काय काय अडचणींचा सामना करावा लागतो, 5 स्टार रेटिंग मिळवण्यासाठी त्याला किती घाम गाळावा लागतो, एका दिवसात 10 डिलिव्हरी पूर्ण करण्याचं टार्गेट अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. कोरोनाकाळात एका मध्यमवर्गीय कुटुंबाला कोणत्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला याचं उत्तम चित्रण 'झ्विगॅटो' या सिनेमात करण्यात आलं आहे.
मानव त्याच्या आयुष्यात संघर्षाचा सामना कसा करतो हे खरचं पाहण्याजोगं आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाचं चित्रण या सिनेमात योग्यपद्धतीने केलं आहे. प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवणारं कथानक, प्रत्येक फ्रेमची योग्य बांधणी ही सिनेमाची उजवी बाजू आहे. वास्तवाची जाणीव करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
कपिल शर्माची कमाल!
'झ्विगॅटो' या सिनेमात कपिल शर्माने कमालीचा अभिनय केला आहे. डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारण्यासाठी कपिल शर्माने खूप मेहनत घेतली आहे. अभिनय, बॉडी लेंग्वेज अशा अनेक गोष्टींचा त्याने अभ्यास केला आहे. त्यामुळे 'झ्विगॅटो' या सिनेमातील मानव प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने डिलिव्हरी बॉयचं वाटतो.
'झ्विगॅटो' या सिनेमाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाने बेरोजगारीसारख्या मुद्द्यावरदेखील प्रकाश टाकला आहे. दुसरीकडे या सिनेमाचं कथानक खूपच रेंगाळलेलं आणि रटाळ आहे. या सिनेमात इतर सिनेमांप्रमाणे थरार-नाट्य नसलं तरी हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. नंदिता दासने या सिनेमाचं उत्तम दिग्दर्शन केलं आहे. पण तरीही प्रेझेंटेशनच्या बाबतीत सिनेमा कुठेतरी कमी पडला आहे.