Jhund Movie Review : ‘झुंड’...भिंतीपलिकडच्या माणसांची अस्वस्थ करणारी गोष्ट!
नागराज मंजुळे हे रसायन वेगळं आहे. त्याची माती वेगळं आहे, त्याचं पाणी वेगळं आहे आणि त्यात रुजलेली झुंड नावाची ही फिल्म एकाच वेळी अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी आहे.
नागराज मंजुळे
अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु
'झुंड' या सिनेमाबद्दल जर अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर 'फँड्री'तला जो जब्या आहे त्याच्या हातात दगडाऐवजी जर फुटबॉल दिला तर काय होऊ शकेल त्याची ही गोष्ट आहे. व्यवस्थेच्या विरोधात भिरकावलेला तो दगड जितका बदल घडवून आणू शकत नाही त्याच्या शतपटीने करामत हा फुटबॉल करतो. अर्थात यातला फुटबॉल, तो खेळ हे सारंच प्रतिकात्मक आहे. त्यामागचा हेतू आणि सांगणं हेच की ज्यांना आजवर समाजाने केवळ नाकारलं, व्यवस्थेने फक्त लाथाडलं त्यांच्यातही कमालीची ऊर्जा आहे, त्यांच्यातही कमालीची ताकद आहे. त्या शक्तीला योग्य दिशा दिली तर जग बदलण्याचा दम त्यांच्यात आहे.
व्हिन्सेन्झो नावाची एक कोरियन वेबसीरिज आहे. जवळपास तीस तासांची. यातला जो हिरो आहे त्याचं या सीरिजमधलं सगळ्यात शेवटचं एक वाक्य आहे. नकारात्मकतेत प्रचंड शक्ती असते. एखाद्या अणुबॉम्बसारखी. फक्त ती सकारात्मक गोष्टींसाठी वापरुन घेता आली पाहिजे आणि ती वापरुन घेण्याची प्रतिभा असलेलं कोणीतरी तिथे असलं पाहिजे.
'झुंड' हेच आपल्यासमोर मांडतो. ट्रेलर पाहिला की वरवरची गोष्ट कळते. पण हा सिनेमा खोल आहे. झोपडपट्टीतली चार पोरं गोळा केली, त्यांचा थोडा संघर्ष दाखवला, त्यांना फुटबॉल शिकवला आणि पुढे जाऊन त्यांनी एक मोठी स्पर्धा जिंकली आणि त्यांचं आयुष्य बदललं एवढ्यापुरता हा सिनेमा नाही.
आपली व्यवस्थेची भीषणता हा सिनेमा दाखवतो. झोपडपट्टीतल्या त्या मुलांचं जगणं वाईट आहेच पण आपली व्यवस्था किती भयंकर आहे हे अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून हा सिनेमा आपल्यासमोर ठेवतो आणि तेही कसलाच आव न आणता.
आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि जातीय भिंतींमुळे जगापासून तोडली गेलेली ती पोरं तसं पाहिलं तर सुखात आहेत. त्यांना कोणाशीच, काहीच घेणं देणं नाही. बरं-वाईट, पाप-पुण्य ही समीकरणं त्यांच्या आसपासही नाहीत. पण म्हणून त्यांना त्याच घाणीत लोळू देणं आणि तसंच मरु देणं म्हणजे समाज म्हणून आपण किती नालायक आहोत हे दाखवून देणं आहे. आणि तोच आरसा हा सिनेमा आपल्याला दाखवतो.
या सिनेमाबद्दल मी जेव्हा अजय-अतुल जोडीतल्या अजयशी बोललो होतो तेव्हा तो म्हणाला होता की, मुंबई-पुण्यात आपली गाडी जेव्हा सिग्नलला उभी असते आणि एखादा भीक मागणारा मुलगा आपल्या गाडीच्या काचेवर टकटक करतो आणि एक दोन रुपयांची भीक मागतो तेव्हा आपण त्याच्याकडे पाहिलंच नाही असा अविर्भाव आणतो. तो काच वाजवत असतो आणि आपण त्याच्या अस्तित्वाची दखलच घेत नाही. त्या दुर्लक्षलेल्या, नाकारलेल्या माणसांची गोष्ट म्हणजे झुंड हा सिनेमा. आपण जेव्हा त्यांच्याकडे ढुंकुनही पाहात नाही तेव्हा त्यांच्या मनाचं काय होत असेल याचा साधा विचारही आपण करत नाही.
या सिनेमात एक सीन आहे ज्यात ही सगळी पोरं आपआपली ओळख करुन देतात. त्यावेळी यात जो बाबू आहे त्याचं पहिलंच वाक्य आहे की, "आजतक किसी ने पुछा ही नही की तुम कौन हो या आपने बारे में बताओ. बताने के लिए हमारे पास कुछ नहीं है लेकिन अच्छा लगा आपने पुछा."
नागराजचा प्रत्येक सिनेमा काहीतरी सांगत असतो, काहीतरी मांडत असतो किंबहुना काही तरी सांगायचं असतं म्हणूनच तो सिनेमा करतो. फँड्री असो, सैराट असो, पावसाचा निबंध असो वा नुकतीच रिलीज झालेली वैकुंठ ही शॉर्टफिल्म असो. या प्रत्येक कलाकृतीतला नागराज जरी वेगळा असला तरी त्याचं म्हणणं ठाम असतं. कधी ते थेट पोहोचतं तर कधी ते समजावून घ्यावं लागतं. झुंड ही समजून घेण्याची गोष्ट आहे. सैराटसारखा तो थेट नाही. किंबहुना सैराटची अपेक्षा ठेवून गेलात तर तुमचा भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त आहे.
यातली सौंदर्यस्थळं तेवढी सोपी नाहीत. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक घटना समजून घ्यावी लागेल. सिनेमा पाहाताना तेवढं सजग तुम्हाला राहावं लागेल. जेव्हा कुठल्यातरी आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या एका पोरीला पासपोर्ट काढायचा असतो तेव्हा तिची होणारी दमछाक दाखवत असताना कॅमेरा हळूच पॅन होतो आणि डिजिटल भारतची जाहिरात असलेला मोठा फ्लेक्स आपल्याला दाखवतो. त्या एका शॉटमध्ये टोकाचा विरोधाभास तो मांडतो. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा अर्थ मात्र प्रचंड मोठा आहे. आणि तो समजून घेणं म्हणजे प्रेक्षक म्हणून आपली एका अर्थाने परीक्षा आहे. त्यात तुम्ही पास झालात तर झुंडचा संपूर्ण आनंद तुम्हाला घेता येईल.
ही कोणत्याच अर्थाने टिपिकल स्पोर्ट्स फिल्म नाही. असलीच तर समाज आणि व्यवस्थेने मांडलेल्या खेळाची ही गोष्ट आहे आणि या खेळातली सगळी पात्रं आपल्याला थेट भिडणारी आहेत. यातल्या पोरांनी कमाल केली आहे. अभिनयापलिकडचा त्यांचा परफॉर्मन्स आहे. त्यांच्या सहजतेपुढे कधी कधी अमिताभही अवघडलेला वाटतो इतकं जबरदस्त काम या साऱ्यांनी केलं आहे.
यातले काही काही संवाद प्रचंड ताकदीचे आहेत. पण ते अगदी सहज येतात. 'भारत मतलब क्या?' असं जेव्हा तो चिमुरडा विचारतो तेव्हा हसावं की रडावं तेच आपल्याला कळत नाही. असे अनेक संवाद आहेत पण ते अगदी सहज येतात. आता कशा टाळ्या घेतो बघा असा आव आणून केलेलं ते काम नाही.
अजय-अतुलचं संगीत पूरक आहे. कथेतून आपल्याला बाहेर घेऊन जात नाही. या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू सुधाकर रेड्डी येंकट्टीचा कॅमेरा आहे. सिनेमा या माध्यमाची खरी ताकद दाखवून देणारं हे काम आहे. हजार शब्दांपेक्षा काही फ्रेम्सचा एक शॉट काय जादू करु शकतो हे सांगणारी ही सिनेमेटोग्राफी आहे.
शेवटी या साऱ्याचा लसावी काढायचा झाला तर एकच शॉट मी सांगेन, विमानतळाला खेटून असलेली झोपडपट्टी, त्याच्या मध्ये असलेली भिंत आणि तिथून उडणाऱ्या विमानावरुन त्या भिंतीवरच्या एका वाक्यावर येऊन रोखलेला कॅमेरा आणि ते वाक्य म्हणजे ही भिंत ओलांडण्यास सक्त मनाई आहे.
त्या भिंतीअलिकडच्या आणि पलिकडच्या माणसांची ही 'झुंड' तुम्ही आवर्जून घ्यावा असा अनुभव आहे.
शेवटी एवढंच सांगेन की नागराज मंजुळे हे रसायन वेगळं आहे. त्याची माती वेगळं आहे, त्याचं पाणी वेगळं आहे आणि त्यात रुजलेली झुंड नावाची ही फिल्म एकाच वेळी अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी आहे. डिस्क्लेमर हाच की सैराटची अपेक्षा ठेवून जाऊ नका.
या सिनेमाला मी देतोय चार स्टार्स.