गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण आणि बरचं काही, कसा आहे 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीजन
City Of Dreams 3 Review: सिटी ऑफ ड्रीम्सचा तिसरा सीजन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये राजकारण त्यात गुरफटलेली नाती हे सगळं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Nagesh kukur
Priya Bapat, atul Kulkarni, Sachin Pilgoanakar
City Of Dreams 3 Review : राजकारण हा सर्वांच्या आवडीचा नसला तरीही चर्चा करण्यासाठी अव्वलस्थानी असलेला विषय आहे. याच राजकारणावर आधारित 'सिटी ऑफ ड्रीम्स' (City Of Dreams) या वेब सिरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खरंतर पहिले दोन सीझन पाहिल्यानंतर या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे तिसऱ्या सीझनमधून लोकांना बऱ्याच अपेक्षा देखील होत्या. राजकारणात अडकलेली नाती, त्यांच्यात निर्माण होणारा दुरावा असं सर्वसाधरणपणे दुसऱ्या सीझनपर्यंत या सीरिजचा प्रवास होता. मात्र तिसऱ्या सीझनमध्ये या नात्यांमधील दुरावा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ज्या राजकारणामुळे बाप लेकीच्या नात्यात दुरावा आला तेच राजकारण या सीझनमध्ये या बाप लेकीला जवळ आणते. राजकारणामुळे गायकवाड घराण्यात काहूर माजला होता. पूर्णिमा गायकवाड हिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यातून तिने तिच्या भावाची हत्या यामुळे राजकारणात कोण कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकते याची प्रचिती येते. पण तिच मुख्यमंत्री जेव्हा आई म्हणून कमी पडते तेव्हा मात्र तिला कशाचेच आणि कोणाचेच भान राहत नाही.
दुसऱ्या सीजनच्या शेवटच्या भागामध्ये पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारणाऱ्या प्रिया बापटच्या मुलाचा म्हणजे अमितचा मृत्यू होतो. त्यानंतर एका आईची होणारी अवस्था ही प्रिया बापटच्या अभिनयामुळे अनुभवण्यास मिळते. अगदी स्वत:च्या भावाचा जीव घेण्यास मागे पुढे न बघणारी एक राजकारणी महिला जेव्हा आईच्या भूमिकेत येते तेव्हा मात्र ती कोणाचीच नसेत हे यावरुन स्पष्ट होतं. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतो तो प्रिया बापट हिचा अभिनय. प्रियाची भूमिका ही तिन्ही सीझनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने समोर आली आहे. पण त्या वेगळेपणात तिच्या अभिनयात तिने कुठेच कमतरता भासू दिली नाही. तिचं शारिरीक आकर्षण पण तरीही मुलावर असलेलं आईचं प्रेम या दोन्ही टोकांच्या गोष्टी तिने अगदी सहजपणे तिसऱ्या सीझनमध्येदेखील पेलल्या आहेत.
एखादी महिला जेव्हा राजकारणात काही करू पाहते तेव्हा तिला होणारा विरोध हा काही नवीन नाही. पण कोणत्याच गोष्टीला न डगमगता त्यांना सामोरी जाणारी महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री ही राजकारणाची एक वेगळी बाजू दाखवून देते. पक्षांतर्गत वादाचा पक्षातील इतर लोकांनी घेतलेला फायदा पण तरीही गायकवाड घराण्याची राजकारणाविषयीची आत्मियता देखील जाणवते. राजकारणात सख्खं कोणीच नसतं मग बाहेरचे तर फार दूर राहिले हे सचिन पिळगांवकर यांच्या जगन्नाथ गुरव यांच्या भूमिकेमुळे स्पष्ट होते.
मुंबईसारख्या शहरातून अंडरवल्डचं जग संपवून टाकणं हे मुंबई पोलिसांच्या धैर्याचं आणि त्यांच्या सामर्थ्याचं उदाहारण असल्याचा उल्लेख पहिल्या दोन सीझनमध्ये करण्यात आला आहे. या सीझनमध्ये मुंबई पोलिसांवर एक नवी आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात येते. त्यामध्ये मुंबई पोलिसांची भूमिका ही वाखडण्याजोगी ठरली आहे. पोलिसांना फक्त खाकी हवी असते आणि लोकांची सेवा करण्याची त्यांचे असलेलं ध्येय या सर्वांची जाणीव पोलिसांची भूमिका साकारणाऱ्या वसिम खान याच्यामुळे होते. पण तरीही पोलिसांच्या काही मतांवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होते.पहिल्या सीझनपासून अनेक पात्रांच्या भूमिकांबद्दल राहिलेले संभ्रम या सीझनमध्ये मात्र दूर होतात. पण तरीही राजकारणासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या नेत्यांविषयी असणारी मनात असणारी अढी मात्र आणखी वाढते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात होणारे बदल, प्रत्येकाला असणारी सत्तेची हाव आणि त्यासाठी त्यांच्याकडून करण्यात येणारे प्रयत्न यांमुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. बरं त्या प्रश्नांची उत्तरं देखील हेच राजकारणी देतात हे विशेष.
अनेक नवीन पात्रदेखील या सीझनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रसार माध्यमांची मात्र खरी आणि एक चांगली ओळख या सीझनमध्ये होते. त्यामुळे नेत्यांना बसणारे धक्के आणि त्यांची त्या गोष्टीपासून स्वत:ला वाचवण्याची धडपड ही आजच्या परिस्थितीला अनुकूल तर नाही ना हा प्रश्न मात्र घर करुन बसतो. अनेक नव्या घटनांचा उलघडा देखील या सीझनमध्ये होतो. मात्र काही गोष्टींचा कुठेतरी अतिरेक होतोय असं देखील जाणवतं. काही गोष्टी उगाच ताणल्या आहेत असं वाटतं. पण तरीही त्या गोष्टींचा राजकारणाशी असलेला संबंध हा प्रत्येकवेळेस राजकारणाविषयी असलेलं लोकांचं मत बदलण्यास नक्कीच कारणीभूत ठरेल. परंतु यानंतर आता राजकारण आणि त्यात सक्रिय असणाऱ्या लोकांवर कितपत विश्वास ठेवायचा हा विषय मात्र फक्त चर्चेपुरताच मर्यादित राहणार आहे यात शंका नाही. नागेश कुकुनूरने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा अगदी व्यवस्थितपणे सांभाळली आहे. कोणाचाही भूमिका कुठेही त्याने कमी पडू दिली नाही हे विशेष.
मराठी कलाकारांना हल्ली वेब सीरिजमध्ये चांगल्या भूमिका निभावण्याची संधी मिळत आहे. पण कलाकरांनी त्या भूमिकेला न्याय देणं देखील तितकचं महत्त्वाचं आहे. या सारिजमध्ये प्रत्येक भूमिकेला बऱ्याच प्रमाणात कलाकरांकडून न्याय दिलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वात अव्वल ठरली ती प्रिया बापट. तिने तिच्या भूमिकेबाबत केलेला प्रयोग हा कुठेही वाया गेला नाही आहे. दिग्दर्शकाच्या आणि भुमिकेच्या अपेक्षांना ती अगदी पूर्णपणे खरी उतरली आहे. अतुल कुलकर्णी आणि सचिन पिळगांवकर यांच्या भूमिकेने देखील तितकचं महत्त्व निर्माण केल्याचं जाणवतं. राजकारणाविषयी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही सीरीज तुम्ही आवर्जून बघा. मी या सीरीजला देत आहे साडे तीन स्टार्स.