Jar Tarchi Goshta Natak Review : आधीच्या 'जर' आणि आताच्या 'तर'मध्ये अडकलेल्या नात्याची 'गोष्ट'
Jar Tarchi Goshta Natak Review : या नाटकाची गोष्ट ही फक्त दोघांची नसून व्यक्ती म्हणून प्रत्येकाची गोष्ट आहे. त्या प्रत्येकाच्या गोष्टीला ज्याचा त्याचा अर्थ आहे.
Adwait Dadarkar, Ranjit Patil
Priya Bapat, Umesh Kamat, Pallavi Aajay, Ashutosh Gokhale
Jar Tarchi Goshta Natak Review : हल्लीच्या पिढीचे विषय घेऊन रंगभूमीवर अनेक नवीन नाटकं येतायत. बरेच नवीन विषय या नाटकातून रंगभूमीवर मांडले जातायत. विशेष म्हणजे हे विषय तरुण पिढीलाही भावले जात असून त्यामुळे ही पिढीही हल्ली नाटकाकडे आणि नाट्यगृहाकडे ओढली जातेय. सध्याच्या पिढीला ब्रेकअप, घटस्फोट या संकल्पना फार सहज सोप्प्या वाटतात. अर्थात त्याला काही अपवादही असतात. पण तरीही या संकल्पनांना गृहीतच धरलं जातं, असा सध्याच्या पिढीचा माईंडसेटच झालाय, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. असाच काहीसा विषय घेऊन रंगभूमीवर सध्या एक नवं नाटक त्याची छाप सोडतंय. प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर आलीये. याच जोडीने हल्लीच्या पिढीच्या 'जर-तर नात्याची गोष्ट' रंगभूमीवर मांडली आहे.
आयुष्य एकट्याने जगणं जरी पसंत केलं तरी त्यात गंमत आणण्यासाठी आपलं असं कुणीतरी लागतचं. पण म्हणून स्वत:ला बाजूला सारुन त्या नात्यामध्ये वाहून देणंही योग्य नाही. त्यामुळे या सगळ्याचा समतोल साधत ते नातं कसं जापवं, कसं बहरु द्यावं ही सगळी गोष्ट या नाटकाने सांगितली आहे. लग्न झालं म्हणून प्रत्येक गोष्ट आपली होणं गरजेचं नाहीये. तुझं आणि माझंच्या मध्ये थोडं आपलं व्हावं, अशी सरळ व्याख्या या नाटकाची आहे, जी प्रत्येकला भावते. प्रत्येक नात्यामध्ये काहीतरी बेसिक प्रॉब्लेम हा असतोच, मग 'जर' नात्यात गोष्टींचा विचार करण्याची गरज असेल 'तर' बेसिकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, असंही या नाटकातून सांगण्यात आलंय. इतकचं नव्हे तर नाटकाचं संगीतही त्याची विशेष छाप सोडतं. या नाटकाचं 'जर-तरचं गाणं' हे प्रेक्षकांना फार आवडतंय.
'जर-तरची गोष्ट' हे नाव जेव्हा ऐकलं तेव्हा फक्त दोन व्यक्तींची ही गोष्ट असणार असं वाटलं. पण ही फक्त दोघांची नसून व्यक्ती म्हणून प्रत्येकाची गोष्ट आहे. त्या प्रत्येकाच्या गोष्टीला ज्याचा त्याचा अर्थ आहे. राधा आणि समर असं उमेश प्रियाच्या पात्रांची नावं आहेत. प्रेमात पडतात, पुढे लग्नही करतात पण घटस्फोट झाल्यानंतरही आपल्या व्यक्तीवरचं प्रेम आणि त्याची सवय मात्र सुटत नाही, हे या नाटकातून अगदी प्रकर्षाने जाणवतं. सध्या दोन भेटीत लग्नाचा निर्णय घेणारी लोकं लग्नाच्या अवघ्या दोन वर्षातच घटस्फोटही घेतात. त्यामुळे नात्यातील गंमत, त्याची जादू ही उलगडण्याआधीच हरवली जाते. या नाटकात एक खूप छान वाक्य आहे, आपला काळच प्रॉब्लेमॅटीक आहे. नातं टीकवण्यासाठी आधीच्या पिढीचे फंडे आपल्याला मान्य नाहीत आणि आपल्याला आपले नवे फंडे शोधायचे नाहीत. त्यामुळे आधीच्या जर आणि आताच्या तरमध्ये अडकलेली आपली पिढी आहे. या वाक्यातच आताच्या पिढीचा सगळा प्रोब्लमच मांडला आहे.
कोणतंही नातं टिकणं ही काळाची नसून दोन माणसांची गरज असते. कधी कधी काही नाती टीकण्यासाठी नसतातच, म्हणून ते टीकूच नये यासाठीही प्रयत्न करणारी लोकं आहे. बऱ्याचदा नात्यात घुसमट होते म्हणून तोडून टाकणं अनेकांना सोप्पं वाटतं, तर कधी आपल्या माणसाने पूर्णवेळ फक्त आपलंच राहावं अशी अपेक्षा बागळणाऱ्यांमुळे नात्याची वीण हरवत जाते. ही सगळी लोकं या नाटकात आहेत. आशुतोष गोखले आणि पल्लवी पाटील यांचं पात्र काहीसं असं आहे. त्यामुळे या चौघांमध्येही हे नाटक पाहताना आपणचं तिथे आहोत ही जाणीव प्रकर्षाने होते. प्रिया खरंतर बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर परतली आहे. पण तरीही नाटकाच्या प्रेक्षकांच्या आजही ती तितकीच पसंतीस उतरतेय.
या नाटकाचे जेव्हा प्रोमो आले तेव्हा असं वाटलं की आता रंगभूमीवरही रोमँटीक गोष्टी येणार, ज्याने पुन्हा प्रेक्षकवर्ग कंटाळणार आणि नाटकाकडे पाठ फिरवणार. पण हे नाटक जेव्हा पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की हे विषय नाटकांच्या माध्यमांतून मांडणं हल्ली फार गरजेचं झालंय. कौतुकाची गोष्ट म्हणजे या नाटकाला तरुणांसह आजी-आजोबा, आई-वडील या वर्गातूनही उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे तुम्ही कोणत्या नात्यात असो, कोणत्यातरी नात्यात येण्याचा प्रयत्न करत आहात, नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय किंवा अगदी एकट्याने जगण्याचा निर्णय घेतला असेल तर उमेश-प्रियाची ही जर-तरची गोष्ट प्रत्येकाने पाहायलाच हवी.