Bhool Bhulaiyaa 3: माधुरी, विद्या आणि रहस्य विनोदाची उत्कृष्ट फोडणी
Bhool Bhulaiyaa 3: अनीस बाज्मी कार्तिक आर्यनला रूहबाबाच्या भूमिकेत घेऊन भूल भुलैया 3 प्रेक्षकांसमोर घेऊन आला आहे. या चित्रपटात मंजुलिका असली तरी तिची वेगळी कथा अनीस बाजमीने पडद्यावर मांडली आहे.
अनीस बज्मी
कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी
बॉक्स ऑफिस (Box Office)
Bhool Bhulaiyaa 3 Review: प्रेक्षकांना अंदाज चुकण्याचा आनंद देणारा चित्रपट म्हणजे चांगला चित्रपट असे रहस्यमय चित्रपटाचे ढोबळमानाने वर्णन केले जाते. प्रेक्षक अंदाज बांधत जातात आणि शेवट वेगळाच समोर येतो आणि तोसुद्धा चांगल्या पद्धतीने तेव्हा प्रेक्षक आनंदी होतात. दिग्दर्शक अनीस बाजमीने यापूर्वी नो एंट्री, वेलकम, सिंग इज किंग, वेलकम बॅक असे हिट आणि मनोरंजन करणारे चित्रपट दिले आहेत. मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा आणि डेव्हिड धवनप्रमाणे मनोरंजनात्मक मसालेदार चित्रपट देण्यात अनीस बाजमीचा हातखंडा आहे. अनीस स्वतः चांगला लेखक असल्याने तो कथाही मनोरंजनात्मक पद्धतीने कशी असेल याकडे लक्ष देतो. त्याने यापूर्वी अनेक यशस्वी चित्रपटाच्या कथाही लिहिलेल्या आहेत. 2022 मध्ये त्याने कार्तिक आर्यनला घेऊन भूल भुलैयाचा भाग 2आणला होता. प्रेक्षकांना त्याचा हा विनोदी रहस्यमय पट चांगलाच आवडला होता आणि त्यानंतर त्याने लगेचच भूल भुलैया-3 आणणार असेही घोषित केले होते. त्यानुसार अनीस बाज्मी कार्तिक आर्यनला रूहबाबाच्या भूमिकेत घेऊन भूल भुलैया 3 प्रेक्षकांसमोर घेऊन आला आहे. या चित्रपटात मंजुलिका असली तरी तिची वेगळी कथा अनीस बाजमीने पडद्यावर मांडली आहे.
रुहान (कार्तिक आर्यन) म्हणजेच रूह बाबा भूत काढण्याचे खोटे नाटक करून लोकांना फसवत असतो. अशातच एक दिवस मीरा (तृप्ती डिमरी) रूहानकडे एक ऑफर घेऊन येते. त्यासाठी एक कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवते तेव्हा रुहान मीरासोबत बंगालमधील एका राजवाड्यात जातो. तेथे त्या मंजुलिकाचे भूत पळवून लावायचे असते. मग त्या वाड्यात काय घडते, मंजुलिका बाहेर जाते का? मंजुलिका कोण असते? या प्रश्नांची उत्तरे चित्रपट आपल्याला देतो. हा संपूर्ण प्रवास अनीस बाजमीने अत्यंत मनोरंजन पद्धतीने पडद्यावर साकार केला आहे. विनोद, रहस्याची योग्य सरमिसळ त्याने केली आहे त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत रंजक बनला आहे.
चित्रपटाचे खरे वैशिष्ट्य आहे माधुरी दीक्षित आणि विद्या बालन. चित्रपटात माधुरीची एंट्री झाल्यानंतर तर आणखीनच रंजकता निर्माण होते. माधुरी आणि विद्याने आमी जे तोमार गाण्यावर जो काही डांस केला आहे तो खरोखरच प्रेक्षणीय आहे. केवळ या गाण्यासाठी चित्रपटाच्या तिकिटाला घालवलेले पैसे वसूल झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. माधुरीने या वयातही कमाल केली आहे. अर्थात विद्याही तोडीस तोड आहे म्हणा. पण हे गाणे म्हणजे चित्रपटाचा कळसाध्याय आहे हे माझे मत आहे.
विद्या बालनने मंजुलिका खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. तिचे हावभाव कमालीचे आहेत. प्रेक्षकांना घाबरवण्यात ती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. माधुरी दीक्षितनेही अंजुलिकाच्या भूमिकेत कमाल केली आहे. चित्रपटात माधुरीला पाहणे म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. खरे तर आता माघुरीला घेऊन हॉरर चित्रपट तयार करण्यास हरकत नाही असे म्हणावेसे वाटते. कार्तिकने नेहमीप्रमाणेच रूह बाबाच्या भूमिकेत कमाल केली आहे. तृप्ती डिमरीला विशेष काही काम नाही. कार्तिक, तृप्ती, विद्या आणि माधुरी या चौघांच्या चित्रपटात दुहेरी भूमिका आहेत.
चित्रपटाच्या संगीतात विशेष काही नाही. जुनीच गाणी पुन्हा नव्या रुपात आणली आहेत. एवढेच काय ते वेगळेपण.
अन्य भूमिकांमध्ये राजपाल यादव, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, विजय राज यांनीही बहार उडवून दिली आहे. एकूणच भूल भुलैया 3 पैसे वसूल करणारा चित्रपट आहे.