Alyad Palyad Marathi Movie Review : अल्याड-पल्याड: खिळवून ठेवणारा रहस्याचा खेळ
Alyad Palyad Marathi Movie Review : हॉरर-कॉमेडीपट असलेला 'अल्याड-पल्याड' चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो.
Pritam S K Patil
मकरंद देशपांडे, संदीप पाठक, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर, सुरेश विश्वकर्मा
Alyad Palyad Marathi Movie Review : मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी चित्रपट निर्माते भयपटाच्या वाटेला जातात. त्याच्या परिणामी मराठी मोजकेच भयपट प्रदर्शित झाले आहेत आणि त्यातील मोजकेच प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. हॉरर-कॉमेडीचा ट्रेंड मागील काही वर्षांपासून रूजू पाहतोय. अल्याड-पल्याड चित्रपट (Alyad Palyad Marathi Movie) हा याच पठडीतला आहे. हॉरर-कॉमेडीपट असलेला अल्याड-पल्याड चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. कलाकारांचा अभिनय, तांत्रिक बाबी या जमेच्या बाजू आहेत.
राज्यासह देशातील कोणत्या तरी गावात काहीशी वेगळी परंपरा,चालीरिती असतात. त्या वर्षेनुवर्षे पाळल्या जातात. त्यामागे काही परंपरा, दंतकथा असतात. अशाच एका गावातील गोष्ट 'अल्याड पल्याड' चित्रपटात आहे. संपूर्ण गावातील मंडळी वर्षातील काही दिवस गावाबाहेर राहण्यासाठी जातात. या दोन-तीन दिवसात गावात आत्मे येतात अशी त्यांची समजूत असते. जी व्यक्ती या गावात राहते, त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो. या आधी काहींनी जीव गमावला असल्याचे सांगण्यात येते. त्याच दिवसांमध्ये गावातील ही घडामोड पाहण्यासाठी पंक्यासोबत (भाग्यम जैन) हा चतुर (गौरव मोरे) आणि किश्या (सक्षम कुलकर्णी) हे दोन मित्र येतात. सगळे गाव नदी ओलांडून पलिकडील बाजूला राहण्यासाठी येते. मात्र, आता ओसाड गावात कोण असेल? गावात आता नेमकं काय होत असेल, याची उत्सुकता या तिघांना लागलेली असते. हो-नाही करता करता दिल्या (संदीप पाठक) या नावाड्याला घेऊन जातात. गावात हे चौघे जण जातात. गावात गेल्यावर त्यांच्यासोबत काय होते? तिथे या चौघांशिवाय कोण असतं? गावात येणाऱ्या आत्मा कोणाच्या असतात? गावात कोणते रहस्य अजूनपर्यंत लपले आहे, गावात फक्त चौघेजण गेले असताना एकूण सातजण एकत्र कसे येतात? या सातजणांचा सामना आत्म्यांसोबत होतो का? हे सगळं जाणून घ्यायला चित्रपट पाहावा लागेल.
'अल्याड-पल्याड'चे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील हॉरर-कॉमेडीपटची भट्टी जमवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. कथेची पार्श्वभूमी तयार केली जात असताना चित्रपटाचा पूर्वाध काहीसा संथ वाटतो. त्या तुलनेत उत्तरार्ध वेगवान आणि खिळवून ठेवणारा आहे. पूर्वाधातही चित्रपटाला वेग आला असता तर उत्तरार्ध आणखी रंगवता आला असता. मकरंद देशपांडे यांनी सिद्धयोगी साधूची भूमिका सहजपणे वठवली आहे. संदीप पाठकने दिल्याची भूमिका आपल्या पद्धतीने साकारल्याने धमाल आली आहे. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर यांनीदेखील आपली भूमिका चोख बजावली आहे. गौरव मोरेच्या आपल्या विनोदाची कमाल इथेही दाखवण्यास यशस्वी ठरतो. सक्षमने भेदरट किश्याची भूमिका चांगलीच वठवली आहे. तर, भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपटकरने त्यांना चांगलीच साथ दिली आहे. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटीलने कॅमेऱ्यासमोरही आपली छाप सोडली आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू काहीशी जमेची आहे. चित्रपटाने पूर्वाधात वेग पकडला असता तर उत्तरार्धात आणखी रंगत आणता आली असती.