![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, जाणून घ्या 'वसुबारस' चे महत्व?
Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras).
![Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, जाणून घ्या 'वसुबारस' चे महत्व? Vasubaras Diwali 2022 Today is the first day of Diwali Vasubaras Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, जाणून घ्या 'वसुबारस' चे महत्व?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/2675e21aa578dee5a391c41d1d7c8b1a1666310816528339_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. या वसुबरारसेचं नेमकं महत्त्व काय? याविषयीची माहिती पाहुयात...
आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा सण म्हणजे दिवाळी (Diwali). दरवर्षी सर्वजण अतुरतेनं दिवाळी सणाची वाट पाहत असतात. आज (21 ऑक्टोबर) दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस (Vasubaras) या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.
गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस
वसुबारसच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. त्यादिवशी गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरु यांची पूजा केली जाते. आश्विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.
वसुबारसच्या दिवशी गोडधोड पदार्थ गायीला खाऊ घालतात
वसुबारसच्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरु असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.
वसुबारसच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात
या दिवशी काही स्त्रियांचा उपवास असतो. घरातील गाय वासरांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते. त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावं, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)