(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : महाराष्ट्रातील 'ही' सुंदर छुपी ठिकाणं! हिमाचल, उत्तराखंड विसराल; शांत, निवांत, एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही
Travel : महाराष्ट्रातील लोणावळा, खंडाळा किंवा महाबळेश्वरचे सौंदर्य पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. आम्ही तुम्हाला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एका सुंदर ठिकाणाविषयी सांगणार आहोत.
Travel : 'बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..' या समुहगीतात म्हटल्याप्रमाणे. महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील एक महान राज्य आहे. जे त्याच्या सुंदर आणि मनमोहक ठिकाणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर आणि पाचगणी या महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक दररोज येतात.पण महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांव्यतिरिक्त अशी काही छुपी ठिकाणे आहेत, जिथे एकदा भेट दिलीत की, हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड विसराल. या लेखात आम्ही तुम्हाला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या मालवणच्या त्या सुंदर आणि मनमोहक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हालाही एकदा भेट द्यायला नक्कीच आवडेल.
मालवण बीच - चमकदार पांढरी वाळू आणि निळे पाणी..
महाराष्ट्रातील सुंदर छुप्या ठिकाणांबद्दल बोलायचं झालं तर, निसर्गसौंदर्यानी नटलेलं मालवण असं एक ठिकाण आहे , जिथल्या बीचचा उल्लेख नक्कीच होतो. या बीचचे सौंदर्य इतके लोकप्रिय आहे की येथे दररोज हजारो पर्यटक येतात. मालवण बीचबद्दल असे म्हटले जाते की निसर्गावर प्रेम करणारे पर्यटक येथे नक्कीच येतात. समुद्रातील चमकदार पांढरी वाळू आणि निळे पाणी पर्यटकांना आकर्षित करतात. समुद्रकिनाऱ्यालगत असलेली नारळ आणि काजूची झाडे सौंदर्यात भर घालतात. मालवण समुद्रकिनारा देखील अतिशय स्वच्छ मानला जातो.
सिंधुदुर्ग किल्ला
मालवणपासून हाकेच्या अंतरावर असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा ऐतिहासिक किल्ला तर आहेच, शिवाय एक लोकप्रिय पर्यटन स्थळही आहे. हा ऐतिहासिक किल्ला 1664 मध्ये डच, पोर्तुगीज आणि ब्रिटीशांच्या आक्रमणांना थोपवण्यासाठी बांधण्यात आला होता, असे सांगितले जाते. अरबी समुद्राच्या काठावर वसलेला हा किल्ला त्याच्या सुंदर दृश्यांसाठीही प्रसिद्ध आहे. 48 एकरांवर पसरलेल्या या किल्ल्यावरून समुद्राच्या सुंदर लाटांची प्रशंसा करता येते. किल्ल्यावरून तुम्ही कॅमेऱ्यात सुंदर छायाचित्रे देखील टिपू शकता.
रॉक गार्डन
मालवण येथे असलेले रॉक गार्डन हे अतिशय आकर्षक आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे. चिलाव समुद्रकिनाऱ्यावर वसलेले रॉक गार्डन त्याच्या शांत वातावरणासाठीही प्रसिद्ध मानले जाते. रॉक गार्डन सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी रॉक गार्डनला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात. बागेत असलेले छोटे-मोठे दगडही सूर्यप्रकाशात चमकत राहतात. समुद्राच्या लाटा जेव्हा खडकांवर आदळतात तेव्हा पाहणे हा एक सुखद अनुभव असतो. रॉक गार्डनपासून थोड्या अंतरावर फुलांची बाग देखील आहे.
मालवणमध्ये पाहण्यासारखी इतर ठिकाणे
मालवणमध्ये इतरही अनेक उत्तम ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत भेट देऊ शकता. तुम्ही देवबाग बीच आणि अर्चना बीच सारखी छान ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. याशिवाय, तुम्ही जय गणेश मंदिर आणि केळबाई मंदिर देखील पाहू शकता.
स्कुबा डायव्हिंगचा आनंद!
महाराष्ट्रातील अनेक किनारे स्कुबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध मानले जातात. अनेक लोक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी कुटुंब, जोडीदार किंवा मित्रांसह येतात.
मालवणमध्ये तुम्ही मालवण बीच, देवबाग बीच आणि अर्चना बीचवर स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय मालवणमध्ये पॅरासेलिंग, स्पीड बोट आणि जेट स्कायचाही आनंद लुटता येतो.
मालवणला कसे जायचे?
देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही सहज मालवणला पोहोचू शकता. यासाठी तुम्ही कोल्हापूरहून सहज पोहोचू शकता. कोल्हापूर ते मालवण हे अंतर सुमारे 157 किमी आहे.
याशिवाय मालवण पुण्यापासून सात तासांच्या अंतरावर आहे. मुंबई ते मालवण हे अंतर अंदाजे 530 किमी आहे. अशात कोल्हापूर, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांतून तुम्ही सहज मालवणला पोहोचू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : 'कोकणच्या प्रेमात उगाच लोक पडत नाहीत, इथलं सौंदर्य आहेच तसं!' 'ही' अप्रतिम ठिकाणं एक्सप्लोर करा, या विकेंडला प्लॅन करा