Navratri 2021 : आज घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Shardiya Navratri 2021 Kalash Sthapana Time : आज घटस्थापना... आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरु होतो.
Shardiya Navratri 2021 Kalash Sthapana Time : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला अत्यंत दिलं आहे. आजच्या दिवशी घटस्थानपना करण्यात येते. नऊ दिवसांसाठी देवीची प्रतिष्ठापना केली जाते. अनेकजण नऊ दिवसांसाठी निर्जली उपवास करतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरु होतो. यंदा आज म्हणजेच, 7 ऑक्टोबरपासून नवरात्रीस प्रारंभ होत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे. जाणून घेऊया, घटस्थापनेचा विधी...
शारदीय नवरात्रोत्सव आणि कलश स्थापनेचा मुहूर्त आणि वेळ
नवरात्रीत घट स्थापना किंवा कलश स्थापनेचं विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, आज घटस्थापना करुन देवीच्या शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. ज्या व्यक्तींना 9 दिवसांचं व्रत ठेवायचं असेल, तर त्यांना कलश स्थापनेसोबत नवरात्रीचं व्रत आणि आई दुर्गेच्या पूजेचा संकल्प करावा, असं सांगितलं जातं. त्यानंतर व्रत आणि पूजा सुरु करावी.
यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि वेळ केवळ 50 मिनिटांचाच आहे. पंचांगानुसार, घटस्थापनेनुसार, शुभ वेळ सकाळी 6 वाजून 17 मिनटांपासून ते सकाळी 7 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे.
यंदा नऊ नाहीतर 8 दिवसांचा नवरात्रोत्सव, गुरुचा विशेष योग
शारदीय नवरात्र 7 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरु होऊन 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. परंतु, नवरात्रीमध्ये 9 दिवसांपर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. असं म्हटलं जातंय की, या दिवसांत देवीचं व्रत आणि पूजा अर्चना केल्यानं देवी स्वतः पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांचं दुःख हरण करते. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत खास असतात. घरात, कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं.
शारदीय नवरात्र यंदाच्या वर्षी गुरुवारी सुरु होऊन, गुरुवारीच संपन्न होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्यानं यंदा नवरात्री आठ दिवस साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे. 7 ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष एकमपासून सुरु होऊन दुर्गा महानवमी 14 ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. तसेच 15 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे.
का आठच दिवस साजरी केली जाणार नवरात्र?
यंदाच्या वर्षी तृतीया तिथी आणि चतुर्थी शनिवारी एकाच दिवशी आली आहे. ज्यामुळे चतुर्थीचा लोप झाला. म्हणून यंदा चंद्रघंटा आणि कुष्मांडा या देवीच्या रुपांची एकाच दिवशी पूजा केली जाणार आहे. याच कारणामुळं नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा करण्यात येणार आहे.
दुर्गा मातेची नऊ रूपांमध्ये पूजा केली जाते
1. पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
2. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते.
3. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटाची पूजा केली जाते.
4. चौथ्या दिवशी कुष्मांडाची पूजा केली जाते.
5. पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते.
6. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते.
7. सातव्या दिवशी कालरात्रीच्या रुपाची पूजा केली जाते.
8. आठवा दिवस महागौरीची पूजा केली जाते.
9. नववा दिवस आई भवानीची पूजा केली जाते.