Navratri 2023 : देवी दुर्गेचे प्रथम शक्तीपीठ पाकिस्तानात? नवरात्रीत होते विशेष पूजा, जाणून घ्या
Navratri 2023 : धार्मिक मान्यतेनुसार, देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ पाकिस्तानात आहे, जे केवळ हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही श्रद्धास्थान आहे. जाणून घ्या.
Navratri 2023 : येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात देवी आदिशक्तीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. पण तुम्हाला माहित आहे का? नवरात्रीचा उत्सव केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही (Pakistan) साजरा केला जातो. येथे पहिले शक्तिपीठ बांधले गेले अशी मान्यता आहे. हे कोणते मंदिर आहे? त्याचा इतिहास काय आहे? ते जाणून घ्या
देवीचे 'हे' शक्तीपीठ पाकिस्तानात
असे म्हणतात की, पाकिस्तानात माता हिंगलाजचे सिद्धपीठ आहे. देवीच्या 51 शक्तीपीठांमध्ये याला प्रथम स्थान मिळाले आहे. हिंगलाज माता मंदिर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हिंगोल नदीच्या काठावर पर्वतावर आहे. हा भाग पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. येथे एका छोट्या गुहेत देवीची पूजा केली जाते. हिंगलाजला हिंगुळा असेही म्हणतात, तसेच याला कोटारी शक्तीपीठ म्हणूनही ओळखले जाते.
मुस्लिम बांधवांचीही श्रद्धा
हिंदू याला शक्तीपीठ मानतात, तर मुस्लिम पंथाचे लोक याला 'नानी का हज' असे म्हणतात. पाकिस्तानातील मुस्लिमांचीही हिंगलाज मातेवर श्रद्धा असून ते या मंदिराला सुरक्षा पुरवतात. मंदिराच्या व्यवस्थापन समितीत हिंदू आणि मुस्लिम दोघेही आहेत.
प्रथम शक्तीपीठ कसे बांधले गेले?
धार्मिक मान्यतेनुसार, सतयुगात देवी सतीने आपला देह अग्निकुंडात अर्पण केला होता, तेव्हा भगवान शिवाने सतीच्या शरीर हातात घेऊन तांडव केले, त्यानंतर भगवान विष्णूंनी शिवाला शांत करण्यासाठी त्यांच्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. असे म्हणतात की, सतीच्या शरीराचा पहिला तुकडा, तिच्या डोक्याचा एक भाग, पाकिस्तानमधील 'अघोर' पर्वतावर पडला होता. अशा प्रकारे येथे पहिले शक्तीपीठ निर्माण झाले.
देवीचे नाव ‘हिंगलाज’ कसे पडले?
पौराणिक कथेनुसार येथे हिंगोळ नावाच्या जमातीचे राज्य होते. हिंगोळ एक शूर राजा होता, पण त्याच्या दरबारातील मंत्र्यांचा तो नावडता होता. दरबारातील एका मंत्र्याने राजाला अनेक वाईट कृत्यांचे व्यसन करायला लावले. त्यामुळे प्रजा अस्वस्थ झाली. मग या जमातीने राजाला सुधारण्यासाठी देवीची प्रार्थना केली. देवीने त्याची प्रार्थना ऐकली. अशा प्रकारे कुळाची प्रतिष्ठा अबाधित राहिल्याने या देवीला हिंगलाज माता म्हणून ओळखले जाऊ लागले.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :