Hartalika 2023 : आज हरतालिका, शिव-पार्वतीकडून मिळेल अखंड सौभाग्याचा आशीर्वाद! शुभ मुहूर्त जाणून घ्या
Hartalika 2023 : आज, सोमवार, भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. आज हरतालिका तृतीया आहे, विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. हे व्रत केल्यास भगवान शिव-पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
Hartalika 2023 : आजचा सोमवार हा भगवान शंकराच्या (Lord Shiv) पूजेला समर्पित आहे. आज एक अतिशय शुभ योगायोग घडत आहे. कारण आज शिवभक्तांना भोलेनाथाची पूजा केल्याने दुहेरी लाभ आणि आशीर्वाद मिळणार आहेत. आज हरतालिका व्रत आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या व्रतामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्यासाठी हे निर्जळी व्रत करतात. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलीही योग्य वर मिळण्यासाठी हे व्रत करतात.
हरतालिका शुभ मुहूर्त
हरतालिका तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विधी, नियमानुसार पूजा केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होते. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तृतीया साजरी केली जाते. पंचागानुसार, तृतीया तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पर्यंत असेल. परंतु हे व्रत सोमवारी 18 सप्टेंबरला केले जाईल. सकाळी 6 ते रात्री 8.24 पर्यंत पूजेसाठी योग्य वेळ आहे.
अशी करा हरतालिका पूजा
सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे.
अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा.
घरातील वडीलधार्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी.
पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी.
सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची पूजा करावी.
पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे.
पूजेसाठी लागणारे साहित्य
चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या-तेलाच्या वाती, अत्तर, विड्याची पाने, सुपार्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्याची साधने. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, झाडांची पाने इत्यादी
फळ प्राप्ती नक्की होईल, फक्त व्रत नियम पाळा
पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी.
बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर ,
बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई ,
मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी.
नंतर मनोभावे प्रार्थना करावी.
कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.
दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा.
या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत.
नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकावी
आरती करून दुसर्या दिवशी उत्तरपूजा करून मुर्ती तसेच लिंग विसर्जन करावी.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या
Hartalika 2023 : विवाह जुळताना येतात अडचणी? हरतालिकेच्या दिवशी करा हा उपाय, समस्या होतील दूर