Ganeshotsav 2023 : सुखकर्ता अन् पालनहर्ताही! महाराष्ट्रातील अष्टविनायकांचं 'हे' वैशिष्य महितीये का? वाचा सविस्तर
Ganeshotsav 2023 : अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरं.
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल गणेशभक्तांना लागलीय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण अनेक ठिकाणी गणपती मंदिरांना भेट देतो. या गणेशोत्सवात तुम्हीसुद्धा फिरण्याचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या मंदिरांना नक्की भेट द्या. या मंदिरांचं महत्त्व नेमकं काय ते जाणून घेऊयात.
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरं. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांना मिळून ‘अष्टविनायक’ म्हणतात. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.
गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.
मोरगांव
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस मयुरेश्वर असेही म्हणतात. मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
थेऊर
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. या मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओवऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. चिंतामणींची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख आणि डाव्या सोंडेची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी आहे. देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे.
सिद्धटेक
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. उजवी सोंड असणारा हा एकमेव अष्टविनायक आहे. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जातांना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. या मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आणि 10 फूट रूंद आहे.
रांजणगाव
अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की, त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक आणि पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे.
ओझर
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील गणपतीची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. गणपतीच्या डोळ्यांत माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न आणि मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचा नाश करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे.
लेण्याद्री
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज आहे. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत आणि त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत.
महाड
महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे आणि त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला आणि मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे आणि उजव्या सोंडेची आहे. इ.स. 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
पाली
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी आणि अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे आणि सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.
महत्त्वाच्या बातम्या :
Ganeshotsav 2023: 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिर; यंदा गणेश चतुर्थीनिमित्त देऊ शकता भेट