Makar Sankranti 2024 : मकरसंक्रांतीला झटपट घरी बनवा खमंग आणि स्वादिष्ट तिळाचे लाडू; जाणून घ्या साहित्य आणि कृती
Makar Sankranti 2024 : तिळाच्या लाडूंचा आणि मकर संक्रांतीचा संबंध शतकानुशतके जुना आहे. तीळ आणि गूळ हे पौष्टिक असतात.
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2024) सण बघता बघता उद्यावर (15 जानेवारी) येऊन ठेपला आहे. या निमित्ताने घरोघरी तिळाचे लाडू (Sesame laddu) आणि चिक्की बनवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. काहींच्या घरातून तर तिळाच्या लाडूंचा खमंग सुगंधही दरवळू लागला आहे. अशातच तुम्हालाही तिळाचे लाडू आणि चिक्की बनवायची हौस असेल पण, कामाच्या धावपळीतून वेळ देता येत नसेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला तिळाचे लाडू बनवण्याची सोपी आणि झटपट रेपिसी सांगणार आहोत. जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि लाडूच्या गोडव्याने सणाचा आनंदही द्विगुणित होईल.
तिळाच्या लाडूंचा आणि मकर संक्रांतीचा संबंध शतकानुशतके जुना आहे. तीळ आणि गूळ हे पौष्टिक असतात. हिवाळ्यात आपल्या शरीराला ते अधिक उबदार ठेवतात. तीळ आणि गुळापासून बनवलेले हे लाडू केवळ तोंडाची चव भागवत नाहीत तर मकर संक्रांतीच्या सणाला आणखी खास बनवतात. आज आम्ही तुम्हाला तिळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता.
तिळाचे लाडू बनविण्याचे साहित्य
- 1 कप पांढरे तीळ
- 1 कप गूळ (कापून तुकडे केलेले )
- 1/4 कप किसलेला नारळ
- 1/2 चमचे वेलची पावडर
- 1 चमचा तूप
- भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम - दोन मोठे चमचे
तिळाचे लाडू बनविण्याची कृती
- सर्वात आधी एका कढईत तूप गरम करून मध्यम आचेवर तीळ भाजून घ्या. तिळाचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढा आणि थोडे थंड होऊ द्या.
- आता त्याच पातेल्यात गुळ घालून मंद आचेवर विरघळ घ्या.
- गूळ पूर्णपणे विरघळ्यानंतर त्यात तीळ, खोबरे आणि वेलची पावडर घाला. हे मिश्रण साधारण 2-3 मिनिटं ढवळून एकजीव करा.
- मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
- मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्याचे हलक्या हाताने लाडू वळवण्यास सुरुवात करा.
- लाडू वळवण्यासाठी हाताला तूप लावून घ्या. अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे लाडू बनवा.
- तुमचे तिळाचे खमंग आणि स्वादिष्ट लाडू तयार आहेत. या लाडूंनी तुमच्या कुटुंबियांचं तोंड गोड करा आणि मकर संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्याचा मनसोक्त आनंद लुटा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Makar Sankranti 2024 : संक्रांतीला तिळाचे लाडू बनवताय? वाचा तिळाचे भन्नाट फायदे