(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lifestyle: तुमचे, लहान मुलांचे फोटो सतत शेअरिंग किंवा स्टेटसला ठेवता? लाईक्स अन् व्ह्यूजचा नाद पडेल महागात! धोक्याची घंटा, आताच सावध व्हा
Lifestyle : सोशल मीडियावर तुमचे मुलांचे फोटो शेअर करताना आपण अनेकदा उत्साही असते. मात्र असे करणे धोकादायक ठरू शकते. कसे ते जाणून घ्या..
Lifestyle : आजकाल सोशल मीडियाचा (Social Media) बोलबाला सर्वत्र पाहायला मिळतो, लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिक असे सर्व वयोगटातील व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असताना दिसते. सध्याची स्थिती पाहता प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय असतो. लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात अनेकजण मात्र खाजगी आयुष्यात जे काही चालले आहे, त्याच्याशी संबंधित गोष्टी इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. मुलंही आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचा निरागस आणि खोडकरपणा पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. अशा सुंदर क्षणांची जपणूक करण्यासाठी पालक अनेकदा त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात, किंवा स्टेटसला ठेवतात, असे कंटेट यूजर्सना खूप आवडते. तुमच्या आयुष्यातील क्षण किंवा मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ ऑनलाइन शेअर करणे कितपत सुरक्षित आहे? जाणून घ्या...
मुलांचे फोटो शेअर किंवा स्टेटसला ठेवताय?
मुलांचे बालपण ही अशी स्थिती असते, जेव्हा मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मोठी होत असतात. ते गोष्टी समजून घेण्याची आणि स्वतःशी जोडण्याची क्षमता विकसित करतात. अशा वेळी, त्यांचे फोटो किंवा रील शेअर केल्याने त्यांच्या प्राइव्हसीपासून त्यांच्या वागण्यापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. मुलांशी संबंधित चुकीचा मजकूर पोस्ट करणे इंटरनेटच्या जगात धोकादायक ठरू शकते.
मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने धोका?
मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना पालकांनी सावध राहणे आवश्यक आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांच्या भविष्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही धोक्यांबद्दल जाणून घेऊया.
मुलांचे भविष्य - इंटरनेटवर काहीही पोस्ट केल्यानंतर, ते काढून टाकणे खूप कठीण आहे. लोक ऑनलाइन शेअर केलेल्या गोष्टींचे स्क्रीनशॉट घेतात. लहान मुलांचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना या फोटो-व्हिडिओतील मूल मोठं झाल्यावर त्याच्यावर किती परिणाम होऊ शकतो याचा नक्कीच विचार करा. याचा मुलाच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार नाही का?
इंटरनेटवर चुकीच्या ठिकाणी व्हायरल होणे - तुमच्या मुलाचे ऑनलाइन किडनॅपिंग होऊ शकते, म्हणजेच फक्त मुलाचे फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या नावाने आणि ओळखीसह वापरले जाऊ शकतात. अनेक वेळा असे देखील घडते, जेव्हा काही लोक ऑनलाइन इतर लोकांच्या मुलांना स्वतःचे म्हणून दावा करतात.
सायबर बुलिंग - मुलांचे किंवा तुमचे फोटो ऑनलाइन शेअर करणे हा एक मोठा धोका आहे. मुलांना थेट सायबर बुलिंगचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्याचा परिणामही मोठा आहे. फोटो किंवा व्हिडीओ पाहून मुलांना चिडवले जाते. नकारात्मक कमेंट्स ऑनलाइन केल्या जातात. या सर्व गोष्टींपासून मुलांना दूर ठेवणे खूप गरजेचे आहे.
अश्लील कंटेट/पेडोफाइल्स - काही लोक चुकीच्या मार्गाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंचा फायदा घेतात. या पीडोफाइलना चाइल्ड पोर्नोग्राफीचे वेड आहे. असे लोक लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून आक्षेपार्ह वेबसाईट्स किंवा फोरमवर पोस्ट करतात.
इन्स्टाग्राम, फेसबुक, इतर साईटवर शेअर करताना सावधगिरी बाळगा
तुमच्या मुलांचे किंवा तुमचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. ऑनलाइन धमक्या पाहता मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना नेहमी सतर्क राहा.
हेही वाचा>>>
Employee Health : कामाचा ताण...नैराश्य...मनात वाईट विचार..तुम्हालाही त्रास देतायत? चुकीचे पाऊल उचण्यापूर्वी 'या' गोष्टींचे अवश्य पालन करा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )