Winter Care: काय सांगता! तुमच्या ऑफिसची जागा ठरतेय 'सायनस' साठी कारणीभूत! 50% नोकरदारांना त्रास, ही लक्षणं, तज्ज्ञ सांगतात...
Winter Care: तज्ज्ञ सांगतात, नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये सायनसायटिसचे प्रमाण वाढत असून, यामागे कामाची जागा हे मोठे कारण असल्याचे डॉक्टर सांगतात.

Sinusitis: सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे, अनेक ठिकाणी थंडीचा जोरही वाढतोय. अशा वातावरणातही नोकरदार लोकांना पर्याय नसल्याने नोकरीवर हजर राहावे लागत आहे, अशात, थंड आणि कोरड्या एसी ऑफिसपासून ते धुळीने भरलेल्या कामाच्या ठिकाणांपर्यंत बदलत्या कामाच्या वातावरणामुळे शहरांमध्ये सायनसायटिसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये सायनसायटिसचे प्रमाण वाढत असून, यामागे कामाची जागा हे मोठे कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. अनेक जण बंद आणि एसी असलेल्या ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करतात, तर काही जण धूळ, रसायने, धूर किंवा बांधकामाच्या ठिकाणी काम करतात. यामुळे नाकातील आतली त्वचा चिडचिडी होते आणि सायनसचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याबाबत पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. सुश्रुत देशमुख यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
सायनसायटिसची 'ही' लक्षणं माहितीयत?
सायनसायटिस म्हणजे नाकाच्या आजूबाजूच्या पोकळ्या (सायनस) सुजणे आणि बंद होणे. संसर्ग, अॅलर्जी किंवा प्रदूषणामुळे या पोकळ्यांमध्ये कफ साचतो आणि त्रास होतो. याची कारणे म्हणजे सर्दी-खोकला, अॅलर्जी, धूळ-धूर, अचानक तापमान बदल किंवा नाकाच्या रचनेतील दोष. नाक कोंदणे, चेहऱ्यावर दुखणे, डोकेदुखी, दाट सर्दी, वास येणे कमी होणे, खोकला आणि थकवा ही याची सामान्य लक्षणे आहेत. डोकेदुखी, नाक बंद होणे, वारंवार सर्दी अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी काही सोप्या सवयी अंगीकारण्याचा सल्ला दिला आहे—थेट एसीखाली बसू नका, धूळ व प्रदूषणापासून दूर राहा, नाक मीठाच्या पाण्याने धुवा, वाफ घ्या आणि गरम पाण्याचा शेक करा. भरपूर पाणी प्या, विश्रांती घ्या, पौष्टिक आहार घ्या आणि डॉक्टर सांगतील ती औषधे घ्या.
'या' वयोगटातील नोकरदारांना मोठा त्रास
डॉ. सुश्रुत देशमुख म्हणाले, “सध्या एअर कंडिशनरमधील थंड हवा नाकातील मार्ग कोरडे करते, त्यामुळे ते संसर्गासाठी अधिक संवेदनशील होतात. नीट स्वच्छ न केलेल्या व्हेंट्समधून धूळ, बुरशीचे बीजाणू व सूक्ष्मजीव पसरू शकतात. बाहेरील उष्णता आणि आतल्या थंड वातावरणातील सततचा बदल सायनसेसना चिडचिडा बनवतो व वारंवार सूज निर्माण करतो. बांधकाम, उत्पादन, वेअरहाऊस किंवा रस्त्यालगतच्या भागात काम करणाऱ्यांना धूळ, सिमेंट पावडर, रसायने व प्रदूषित हवेचा सातत्याने संपर्क येतो. योग्य संरक्षण न वापरल्यास हे त्रासदायक घटक थेट सायनसच्या आवरणाला सूज आणतात आणि दीर्घकालीन लक्षणे निर्माण होतात. सुमारे 50% सायनसायटिस प्रकरणे कामाच्या ठिकाणामुळे उद्भवत आहेत. दर महिन्याला 20-30 वयोगटातील 10 पैकी 5 पुरुष रुग्ण चेहऱ्यावरील वेदना/दाब, डोकेदुखी, दाट नाकातील स्त्राव, वास कमी होणे व खोकला अशा सायनसायटिसशी संबंधित लक्षणांसह येतात.”
काय काळजी घ्याल?
डॉ. देशमुख पुढे म्हणाले, “रुग्णांची तपासणी करून गरज असल्यास नाकाची एंडोस्कोपी किंवा सीटी स्कॅन केला जातो आणि उपचार दिले जातात. सायनसायटिस टाळण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, वाफ घ्या, गरम शेक करा, धूम्रपान-मद्यपान टाळा, अॅलर्जी नियंत्रणात ठेवा, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. एसी ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी एसीची नियमित साफसफाई करावी आणि थेट थंड हवेच्या खाली बसू नये. धुळीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी मास्क वापरावा आणि कामानंतर चेहरा व नाक स्वच्छ धुवावे. 10 दिवसांपेक्षा जास्त काळ त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”
हेही वाचा
Winter Care: वाढती थंडी, स्नायूंवर दबाव, पाठदुखीच्या समस्यांमध्ये होते वाढ, सांध्याची काळजी घेणं गरजेचं, तज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























