Protein For Health: अनेक मुलं जेवणातील बरेच पदार्थ खाण्यास टाळाटाळ करत असतात. अशा वेळी समस्त आई वर्गाची तारांबळ उडालेली असते. आपल्या मुलांना संपूर्ण पोषण मिळावं यासाठी आई अनेक प्रयत्न करत असते. काही लहान मुलांना जेवणातील डाळ आणि भाजी हे पदार्थ अजिबात आवडत नाहीत. अनेकदा ते पदार्थ पाहून लहान मुलं नाक मुरडतात. अशावेळी आईला चिंता असते ती मुलांना योग्य प्रमाणात प्रोटीन कसे मिळेल याची.. डाळ आणि भाज्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. प्रोटीन लहान मुलांच्या वाढीसाठी आणि मानसिक विकासातही अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच वाढत्या वयातील मुलांच्या आहारात जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश केला पाहिजे.
प्रोटीन अर्थात प्रथिनांनमुळे शरीरात नवीन पेशी तयार होतात. याशिवाय पेशींची दुरुस्ती करण्यातही प्रोटीन उपयोगी ठरते. केस, त्वचा, हाडे, नखे, स्नायू, पेशी निरोगी ठेवण्यासाठी शरीराला प्रोटीनची गरज असते. अशावेळी जर लहान मुलं डाळी आणि भाज्या खात नसतील, तर त्याऐवजी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करून त्यांच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढू शकता.
सोयाबीन : सोयाबीन हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये एकूण 36.9 ग्रॅम प्रोटीन आढळते. सोयाबीनचा आहारात समावेश करून, तुम्ही लहान मुलांसह मोठ्यांचीही रोजची प्रोटीनची गरज भागवू शकता.
पनीर : शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पनीरचा समावेश करणे देखील फायदेशीर ठरते. पनीरपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ, चटपटीत नाश्ता मुलांना खायला देऊ शकता.
अंडी : प्रोटीन मिळवण्यासाठी आहारात अंड्यांचाही समावेश करावा. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. केवळ प्रोटीनच नाही तर, अंड्यांमध्ये इतरही अनेक आवश्यक पोषक घटक आणि जीवनसत्त्वे आढळतात.
दूध : दुधात मुबलक प्रमाणात प्रथिने आढळतात. लहान मुलांच्या आहारात दुधाचा आवर्जून समावेश करावा. 100 ग्रॅम दुधात जवळपास 3.6 ग्रॅम प्रथिने आढळतात. त्यामुळे रोज एक ग्लास दूध प्यायल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता सहज पूर्ण होऊ शकते.
सुका मेवा : शरीराला आवश्यक प्रोटीन मिळवण्यासाठी लहान मुलांना काजू आणि बदामही खायला देऊ शकता. सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रोटीन आढळते. लहान मुलांना देखील सुकामेवा खायला आवडतो. अशावेळी त्यांना मिल्कशेक किंवा दुधाचा एखादा पदार्थ बनवून त्यात सुकामेवा घालून खायला द्यावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :