Epilepsy : सध्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे अभिनेत्रीला अटक झाली आहे. या आधी केतकी तिला असेलल्या एका आजारामुळे चर्चेत आली होती. हा आजार आहे अपस्मार. अपस्मार म्हणजे वारंवार फिट येणं. या आजाराला ‘एपिलेप्सी’ (Epilepsy) देखील म्हणतात. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधांनी रुग्ण बरा न झाल्यास शस्त्रक्रिया देखील करता येते. एकूण लोकसंख्येच्या एक टक्के इतक्या लोकांनाच या आजाराची लागण झालेली आहे.


या आजारामुळे खेळणं, पोहणं, वाहन चालवणं अगदी कठीण होतं. व्यक्ती रोजगार, शिक्षण, लग्न, सामाजिक प्रतिष्ठेपासून वंचित राहातो. एपिलेप्सी या आजाराचं वेळीच अचूक निदान न झाल्यास मेंदूची वाढ होत नाही. अनेक मुलांमध्ये मतिमंदत्व देखील येऊ शकतं. यामध्ये कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो.  मेंदूमध्ये गाठ, ट्युमर्स, जन्माच्या वेळी मेंदूला इजा, ही अपस्माराची अर्थात एपिलेप्सीची मुख्य कारणं असू शकतात.


एपिलेप्सी म्हणजे काय?


केतकी दर आठवड्याला अपलोड होणाऱ्या तिच्या व्लॉगमध्ये अपस्मार या आजारावर मात कशी करायची, यातून स्वतःचा बचाव कसा करायचा याची माहिती देते. अभिनेत्री केतकी चितळे ही एपिलेप्सी म्हणजे अपस्मार अर्थात फिट, फेफरे, आकडी, मिरगी येणे या आजाराने ग्रस्त आहे. एपिलेप्सी हा मेंदूसंदर्भातील, मज्जासंस्थेसंबंधीचा आजार आहे, ज्याला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हटले जाते. डॉक्टरांच्या मते, अशा आजारात योग्य त्या वयात आणि वेळीच अचूक निदान होऊन उपाचार न झाल्यास मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. मतिमंदत्व येतं. या मुलांवर योग्य वेळी शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार झाले तर ती पूर्णतः सामान्य आयुष्य जगू शकतात.


एपिलेप्सी ही एक मेंदूची व्याधी


एपिलेप्सी म्हणजे वेड नव्हे. मात्र, आपल्या समाजात अशा रुग्णांना वेगळी वागणूक दिली जाते, समाजात अजूनही अशा रुग्णांना कमी लेखले जाते. एपिलेप्सी ही एक मेंदूची व्याधी आहे आणि न्यूरॉलॉजिस्टच्या उपचारांनी ती पूर्ण आटोक्‍यात राहू शकते. एपिलेप्सी ही फक्त शारीरिक व्याधी नसून आपल्याकडे ती सामाजिक व्याधीसुद्धा आहे. एपिलेप्सी असलेल्या मुलांना शाळेतून काढले जाते. एपिलेप्सी असलेल्या मुलाला कॉलनीत खेळणारी मुले सामावून न घेता दूर ठेवतात. त्याला हसतात. त्याची टिंगल करतात आणि त्यामुळे आधीच त्रास असलेली मुले मनाने निराश बनू शकतात व एकलकोंडी पडू शकतात. अनेकदा विवाह होत नसल्याने ही मुले निराश होतात, वैफल्यग्रस्त होतात. काही या उपेक्षेने टोकाची बंडखोर होतात.


याच आजारामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकले जात असल्याचा आरोप केतकीने यापूर्वी अनेकदा केला आहे. या आजारावर केतकी वेगवेगळे उपचार घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नावदेखील ‘एपिलेप्सी वॉरियर क्वीन’ असं ठेवलं आहे. यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एपिलेप्सीसंदर्भात अधिक माहिती देण्याचा प्रयत्न ती करते.


संबंधित बातम्या :