Healthy Diet : अनियमित जीवनशैली (Irregular lifestyle) आणि चुकीच्या आहारामुळे (Unhealthy Diet) आपलं शरीर आपण स्वतःहून आजारांच्या ताब्यात देतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धकाधकीचा दिनक्रम, ऑफिस, घर यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातच कितीही ठरवलं तरीदेखील जिम (Gym), एक्सरसाइज (Exercise) किंवा योगाभ्यास (Yoga) करू शकत नाही. ज्यामुळे वाढत्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे पचनक्रियेवरही परिणाम होतो. ज्याचा परिणाम आपसूकच इतर अवयवांवरही होतो. खासकरुन रात्रीच्या जेवणाबाबत अधिक काळजी घेणं गरजेचं असतं, जी आपण घेत नाही. 


रात्री जेवण झाल्यानंतर आपण थेट बिछाना पकडून झोपून जातो. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचू शकत नाही. यामुळे शरीरातील साखरेच्या पातळीसोबतच संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम होतो. जाणून घेऊयात, रात्रीच्या जेवणानंतर केलेली एक चूक आपल्याला खूपच महागात पडते. 


रात्रीच्या जेवणात चपाती-भात खाण्यानं शरीराला होतं नुकसान 


लठ्ठपणा (Obesity)


रात्रीच्या जेवणात चपाती-भात खाल्यानं लठ्ठपणा वाढू लागतो. चपाती आणि भात या दोन्ही पदार्थांमध्ये हाय कॅलरीज असतात. ज्यामुळे शरीरात फॅट वाढू लागतं. तसेच, त्यामुळे लठ्ठपणाही वाढतो. दोन्ही पदार्थांच्या सेवनानं  मेटाबोलिज्म स्लो होतं. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. 


डायबिटीज (Diabetes)


रात्रीच्या जेवणात चपाती-भाताचं सेवन केल्यानं तुम्हाला डायबिटीज होण्याचा धोकाही संभवतो. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये हाय कॅलरीज असतात. ज्याचं रुपांतर साखरेत होतं आणि शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे तुम्हाला आयुष्यभरासाठी डायबिटीज जडू शकतं. 


झोपेवरही परिणाम होतो (Insomnia)


रात्रीच्या जेवणात चपाती आणि भात खाल्यानं पचक्रियेवर परिणाम होतो. अन्न पचवण्यासाठी शरीराला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे तुमच्या मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मेंदू रात्रभर जागा राहतो आणि तुम्हाला झोप येत नाही. पोटाला त्रास होतो. त्यामुळे झोपायलाही त्रास होतो. चपाती पचण्यासाठी जड असतं, ज्यामुळे पोटात ॲसिडिटी आणि अपचनाची समस्या निर्माण होते. त्यामुळे रात्री भाकरी आणि भात खाणं टाळावं.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Weight Loss Tips : सगळे म्हणतात, जिऱ्याचं पाणी प्या, वजन कमी होईल; पण खरंच असं होतं का?