मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने 7 फेब्रुवारीपासून निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) राज्यव्यापी संपाची (Strike) हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. त्यामुळे याचे परिणाम आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेत बैठक देखील झाली. मात्र, पुन्हा एकदा फक्त आश्वासनच मिळत असल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
'मार्ड'च्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, “शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल 'मार्ड'ची माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन, कमिशनर डीएमईआर डायरेक्टर डीएमईआर, जॉइंट सेक्रेटरी फायनान्स डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या समस्या समजून घेतल्या व 'मार्ड'च्या तीनही मागण्या अगदी बरोबर असून, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु 4 ऑक्टोबर 2023 रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये या तीनही मागण्या मान्य करून चार महिने उलटून सुद्धा त्यापैकी एकाही मागणीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे या मागण्या पूर्ण न झाल्यास आज सायंकाळी 5 वाजल्यापासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.
निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या...
- निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
- निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
- निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.
निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा : हसन मुश्रीफ
राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आजपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे. यावर बोलतांना मुश्रीफ म्हणाले की, “डॉक्टरांनी संप मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारण यावर आमची बैठक झालेली आहे. त्यांची तात्काळ निवासाची व्यवस्था करावी यासाठी भाड्याने इमारती घेण्याच्या सूचना देखील मी सर्व राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रमुखांना सूचना केल्या आहेत. त्यांच्या वेतनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक लावली आहे. ही मागणी देखील त्यांची लवकरच पूर्ण केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! प्रलंबित मागण्यांसाठी 7 फेब्रुवारीपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार