Green Tea : ग्रीन टीचे फायदे अनेक, पण... 'या' चुका पडतील महागात; होईल भलतंच
Green Tea Health Benefits : ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण याचं सेवन करताना काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे.
Green Tea Pro's and Con's : ग्रीन टी (Green Tea) हा दुधाच्या चहाऐवजी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून यामुळे अनेक समस्यांपासून सुटका होते. ग्रीन टीमुळे चयापचय सुधारते, पचन चांगल्या प्रकारे होऊन वजन कमी होण्यासही मदत होते. ग्रीन टीचे फायदे अनेक आहेत, पण याचे सेवन करताना काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा याचा वाईट परिणाम भोगावा लागू शकतो.
ग्रीन टी पिण्याचे फायदे
ग्रीन टी प्यायल्याने इम्युनिटी सुधारते. तसेच यामुळे कर्करोग, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि ह्रदयरोगाच्या रुग्णांसाठीही ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. ग्रीन टी पिण्याचे प्रमाण तसेच वेळ याबाबत योग्य काळजी बाळगल्यास तुम्हाला ग्रीन टीचा भरपूर लाभ घेता येईल, नाहीतर तुम्हाला याच नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे याबद्दल पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच याचं सेवन करा.
ग्रीन टी पिताना 'या' चुका करु नका
1. अनोशेपोटी ग्रीन टी पिणं
जर तुम्ही सकाळी अनोशेपोटी ग्रीन टीचं सेवन करताय, तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करत असाल तर, हे आजच बंद करा. अनोशेपोटी ग्रीन टी प्यायल्याने अॅसिड वाढते. पचनाशी संबंधित कोणतीही समस्या टाळण्यासाठी ग्रीन टी पिण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खा.
2. जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे
ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, असे मानले जाते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अत्यंत वाईट मानला जातो. ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्यास तणाव, निद्रानाश आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दररोज दोन किंवा तीन कप पेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
3. रात्री झोपताना ग्रीन टी पिणे
ग्रीन टीमध्ये कॅफिन देखील असल्याने रात्रीच्या वेळी प्यायल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो. यामुळेच झोपण्यापूर्वी कधीही ग्रीन टीचे सेवन करू नये.
4. जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पिणे
जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिण्याची चूक चुकूनही करू नये. कारण त्यामुळे अन्नातून पोषक तत्त्वे मिळण्यात अडथळे निर्माण होतात. यामुळे अन्नातील लोहाचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. जर तुम्हाला ग्रीन टी प्यायची असेल तर जेवल्यानंतर 1-2 तासांनंतरच ग्रीन टी प्या.
5. औषधांसह ग्रीन टी पिणे
ग्रीन टी काही औषधांसोबत घेतल्यास त्यामध्ये प्रक्रिया होऊन याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामध्ये एन्टीडिप्रेसंट्स, ब्लड थिनर्स आणि ब्लड प्रेशरच्या औषधांचा समावेश आहे. तुम्ही असे कोणतेही औषध घेत असाल, तर ग्रीन टीचे सेवन टाळा किंवा तसे करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
6. टी बॅग पुन्हा वापरणे
ग्रीन टी बॅग्ज पुन्हा वापरणे टाळा. कारण टी बॅग्ज पुन्हा वापरल्याने चहाची चव चांगली राहत नाही. तसेच हा चहा आरोग्यदायी ठरत नाही. यामुळे तुम्हाला पुरेसे पोषण मिळत नाही. प्रत्येक वेळी ग्रीन टी पिताना नेहमी ताजी पाने किंवा नवीन टी बॅग वापरा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Apple Tea : वजन कमी करण्यासोबतच ह्रदयासाठीही फायदेशीर, ॲपल टीचे पिण्याचे 7 भन्नाट फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )