मुंबई : सध्या वातावरण बदलत असून गारवा वाढत आहे. अशातच भारतातही राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचं आगमन झालेलं आहे. पण थंडीसोबतच दिल्लीसह अनेक राज्यांना प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. अशातच बदलतं वातावरण आणि वाढणाऱ्या प्रदूषणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा पदार्थाबाबत सांगणार आहोत, जो तुम्हाला बदलत्या वातावरणासोबतच हिवाळ्यातही आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदेशीर ठरेल. जाणून घेऊयात ऊसाच्या रसापासून तयार करण्यात येणाऱ्या गुळाच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत, जर तुम्हालाही गोड पदार्थ खाण्यास आवडत असतील तर साखरेऐवजी गूळ अत्यंत फायदेशीर ठरतो.


गुळामध्ये आढळून येणारे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेच, आर्यन, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम आणि फॉस्परस मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. गुळ प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामासाठीही अत्यंत गुणकारी ठरतो. तसेच ज्या लोकांना डायबिटीज आहे. तसेच याच कारणामुळे ज्यांनी गोड पदार्थ किंवा साखरेचे पदार्थ खाणं सोडून दिलं आहे. अशा व्यक्ती आपली आवड जपण्यासाठी साखरेऐवजी गुळाचा आपल्या आहारात समावेश करू शकतात. जाणून घेऊयात गुळाच्या औषधी फायद्यांबाबत...


प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी


जर तुम्ही एखाद्या फॅक्ट्री किंवा कारखान्यात काम करत असाल, जिथे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण असतं किंवा तुमच्या शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली असेल तर, तुमच्यासाठी आहारात गुळाचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. प्रदूषित वातावरणात राहणाऱ्या लोकांसाठी गूळ अत्यंत गुणकारी ठरतो. दररोज 100 ग्रॅम गुळाचं सेवन केल्याने प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.


पोटाच्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी


गुळाचं सेवन केल्यानं पोटाच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यास मदत होते. बद्धकोष्ठ, अॅसिडीटी आणि पित्त यांसारख्या समस्यांवर गूळ अत्यंत फायदेशीर ठरतो. पोटाच्या समस्या निर्माण झाल्यास गुळाचे लहान तुकड्यांसोबत सैंधव मीठ किंवा काळं मीठ एकत्र करून खा. तसेच दररोज गुळाचं सेवन केल्यानं पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.


सर्दी, खोकल्यावरही गूळ फायदेशीर


गुळाचा वापर सर्दी आणि खोकल्यावरही फायदेशीर ठरतो. सर्दी झाल्यावर गूळ आणि आलं एकत्र खाल्लं जातं. याव्यतिरिक्त गूळ ओव्यासोबत खाला जाऊ शकतो. त्यामुळे सर्दीची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच सर्दी झाल्यावर तुम्ही काढ्याचंही सेवन करू शकता. या काढ्यात साखरेऐवजी गुळाचा वापर करा.


हाडं मजबूत करण्यासाठी


गुळात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं. जे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याचं सतत सेवन केल्यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होते. तसेच आल्यासोबत गुळाचं सेवन केल्यामुळे हाडंही मजबूत होण्यास मदत होते.


(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :