Breast Cancer: स्तनांच्या आकारात बदल जाणवतोय? वेळीच सावध व्हा, कर्करोग टाळा!
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आणि संकेत, जोखीम घटक आणि नियमित चाचणी केल्यास स्तनांच्या कर्करोगाचे वेळीच निदान होऊ शकते, सुरुवातीच्या टप्प्यावर तो पूर्ण बरा करता येऊ शकतो.
Breast Cancer: महिलांमधील कर्करोगांपैकी स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा जगभरात होणाऱ्या मृत्यूसाठीचे आघाडीचे कारण ठरत आहे. ऑक्टोबर हा महिना स्तन कर्करोग जनजागृती (Breast Cancer Awareness Month) महिना म्हणून पाळला जातो. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आणि संकेत, जोखीम घटक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल जनजागृती, नियमित चाचणी केल्यास स्तनांच्या कर्करोगाचे वेळीच निदान होऊ शकते, सुरुवातीच्या टप्प्यावर तो पूर्ण बरा करता येऊ शकतो.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत ओळखली गेली तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे खालीलप्रमाणे दिसू शकतात.
- स्तनाच्या आकारात कोणताही बदल होणे
- स्तनावरील त्वचा सुरकुतलेली दिसणे
- स्तनाग्रातून दुधाव्यतिरिक्त स्राव बाहेर पडणे
- स्तन किंवा काखेमध्ये नवीन गाठी किंवा लम्प तयार होणे.
- स्तनाग्र आकारात बदल, वेदना किंवा लालसरपणा.
- स्तनामध्ये वेदना, सूज आढळून येणे
कारणे कोणती?
अनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. वयाच्या १२व्या वर्षापूर्वीच मासिक पाळी सुरू झाल्यास तसेच वयाच्या ५५व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास स्तनाच्या कर्करोगाची शक्यता असते. कुटुंब नियोजन औषधांच्या अतिरेकाने देखील स्तनाचा कर्करोग वाढतो. व्यसानाधिनतेमुळे, लठ्ठपणासारखा आजार असलेल्या महिला, अधिक चरबीयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
निदान कसे करतात
स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राम, अल्ट्रासाऊंड, बायोप्सी इत्यादींचा वापर केला जातो. रुग्णाला औषधे, स्तनाची शस्त्रक्रिया, अत्याधुनिक केसेसमध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोनल इंजेक्शन्स इत्यादी उपचार दिले जातात. स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डॉ. सुप्रिया पुराणिक, संचालक – 9M फर्टिलिटी अँड सीनियर कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी, अंकुरा हॉस्पिटल, पुणे.
अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि इम्पीरियल केमिकल इंडस्ट्रीजच्या फार्मास्युटिकल विभाग यांनी 1985 मध्ये स्तन कर्करोग जनजागृती महिन्याची म्हणजेच Breast Cancer Awareness Month ची सुरुवात केली. ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथला (बीसीएएम) युनायटेड स्टेट्समध्ये नॅशनल ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ (एनबीसीएएम) असंही म्हटलं जातं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )