(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हिवाळ्यात ज्यूस पिणं आरोग्यदायी आहे का? आयुर्वेदात काय म्हटलंय? वाचा सविस्तर
Drink Juice In Winter : आजारी पडताच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्यूसचं सेवन केलं जातं. पण, हे थंड ज्यूस आपल्याला हिवाळ्यात फायदेशीर ठरतात की नुकसानकारक?
Drink Juice In Winter : सगळीकडे थंडीचे गार वारे वाहतायत. त्यामुळे शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतो. काही लोक गरम पाणी पितात तर काही सूपचं सेवन करतात. हिवाळ्यात (Winter Season) आपली रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते आणि त्यामुळे अनेकजण आजारी पडतात. आजारी पडताच प्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी ज्यूसचं सेवन केलं जातं. पण, हे थंड ज्यूस आपल्याला हिवाळ्यात फायदेशीर ठरतात की नुकसानकारक? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ऋतू कोणताही असो, योग्य आहार आणि व्यायाम हे निरोगी राहण्याच्या गुरुकिल्ली आहेत. पण, हिवाळ्यात अनेक वेळा आपण अन्नाद्वारे पोषण पूर्ण करू शकत नाही. पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आहारात ड्रायफ्रूट्स, बिया आणि हंगामी फळांचा समावेश करतो. काही लोक या ऋतूमध्ये अनेक प्रकारच्या ज्यूसचा आहारात समावेश करतात. पण हिवाळ्यात ज्यूस प्यावा की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो.
आयुर्वेदात काय म्हटलंय?
आयुर्वेदानुसार हिवाळ्यात आपली पचनसंस्था कमकुवत होते. हिवाळ्यात ज्यूस प्यायल्याने पचनास त्रास होऊ शकतो. तसेच, याचा अर्थ असा नाही की आपण हिवाळ्यात ज्यूस अजिबात पिऊ नये. शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता ज्यूस पिऊन भरून काढता येते. याबरोबरच हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.
हिवाळ्यात ज्यूस पिणे हानिकारक का आहे?
ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेही लोकांनी या ऋतूत ज्यूस पिणे टाळावे. ज्यूसचा थंड प्रभाव असतो ज्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडू शकता. म्हणूनच हिवाळ्यात ज्यूस न पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, असे काही ज्यूस आहेत ज्यांचे सेवन हिवाळ्यात तुम्ही नक्की करू शकता.
1. संत्र्याचा ज्यूस
संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. हे रोज प्यायल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो सुद्धा येतो. ते अँटिऑक्सिडेंट्समध्ये समृद्ध असतात जे आपल्याला हृदयविकारांशी लढण्यास मदत करतात.
2. ABC ज्यूस (Apple, Beetroot, Carrot)
या ज्यूसमध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. या रसात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट आढळतात. हा ज्यूस रोज प्यायल्याने शरीरातील सूज दूर होऊ शकते.
3. आवळ्याचा ज्यूस
तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात आवळ्याचा रस देखील पिऊ शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आवळ्याचा रस चवदार नसला तरी त्याचे अनेक फायदे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.