Health Tips : सेलिब्रेशननंतर थोडा हलका आणि निरोगी नाश्ता हवाय? 'ही' रेसिपी वापरून पाहा
Health Tips : जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत पार्टी केली असेल आणि ड्रिंक्सचे सेवन केले असेल तर दुसऱ्या दिवशी तुमचे शरीर निर्जलीकरण होण्याची शक्यता जास्त असते.
Health Tips : ख्रिसमस आणि नवीन वर्षाला पार्टीचा सीझन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या काळात लोकांचे मोठ्या प्रमाणात गेट-टुगेदर, पार्ट्या, आउटिंग होतात. सेलिब्रेशन असेल तर ते काही लोकांचं ड्रिंक्सशिवाय पूर्ण होत नाही. अशा वेळी आरोग्याची काळजी घेण्यासाठी पार्टीनंतर शक्य तितक्या लवकर हेल्दी लाईफस्टाईल स्विकारणं गरजेचं आहे. आज आपण काही ब्रेकफास्टचे पर्याय जाणून घेऊयात जे पार्टीच्या दुसऱ्या दिवशी घेतले जाऊ शकतात.
हायड्रेशन महत्वाचे आहे
जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत पार्टी केली असेल आणि ड्रिंक्सचे सेवन केले असेल तर दुसऱ्या दिवशी तुमचे शरीर निर्जलीकरण होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही ड्रिंक्स घेतली नसेल तरी हायड्रेशनची पूर्ण काळजी घ्या. दुसऱ्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा. त्यात तुम्ही लिंबू किंवा मधही घालू शकता.
ज्यूसचं सेवन करा
रात्रीच्या पार्टीनंतर, तुम्ही दुसऱ्या दिवशी भाज्यांचा ज्यूस घेऊ शकता जेणेकरून शरीर डिटॉक्स होईल आणि पचनसंस्थेला आराम मिळेल. फळांचा ज्यूस घेऊ नका कारण त्यात साखर असते. भोपळ्याचा रस, गाजर किंवा बीटचा रस तुम्ही घेऊ शकता.
ओटमील आणि इडली-डोसा हे उत्तम पर्याय
तुम्ही दुसऱ्या दिवशी ओटमिल घेऊ शकता. त्यात फक्त साखर घालू नका. त्यातील फायबर तुमच्या पोटासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही इडली आणि डोसासुद्धा खाऊ शकता. लक्षात ठेवा इडली हलकी असल्याने रवा इडली खावी आणि नीर डोसा असावा. सांबर टाळा आणि फक्त चटणी खा.
पॅकेज केलेले अन्न टाळा
काय खावे याबरोबरच काय खाऊ नये हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. पॅकेज केलेले अन्न अजिबात खाऊ नका. तुम्ही डाळी, तांदूळ आणि तूप यांचे मिश्रण खाऊ शकता किंवा खिचडी खाऊ शकता. पण ते अन्न घरगुती आणि ताजे असावे. मैदा, साखर, तेलकट, तळलेले, पॅक केलेले अन्न कधीही घेऊ नका. यामुळे साखरेची पातळी वाढते आणि पोटाला हानी पोहोचते.
'हा' पर्याय देखील वापरून पाहा
तुम्ही शिजलेल्या भाज्या घेऊ शकता. लाप्सी, खिचडी, ताक घेऊ शकता. याबरोबर तुम्ही उकडलेले बटाटे, केळी, हिरव्या पालेभाज्या, काजू, बिया देखील घेऊ शकता. फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही जे काही खात आहात ते जड नसावे किंवा त्यात भरपूर मिरची आणि मसाला नसावा. साधे आणि हलके अन्न खा. चहा किंवा कॉफी अजिबात घेऊ नका.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.