Gokulashtami 2022 : भारतात सर्वत्र गोपाळकालाची उत्सुकता; 'अशी' आहे परंपरा
Gokulashtami 2022 : श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी या नावांनी ओळखला जातो.
![Gokulashtami 2022 : भारतात सर्वत्र गोपाळकालाची उत्सुकता; 'अशी' आहे परंपरा Gokulashtami 2022 know history and importance of the day marathi news Gokulashtami 2022 : भारतात सर्वत्र गोपाळकालाची उत्सुकता; 'अशी' आहे परंपरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/766bd9eb063174a1bf536c78e7ddc3be1660806728838358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gokulashtami 2022 : श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी या नावांनी ओळखला जातो. देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसापासून दूर वसुदेवाने रात्रीच गुप्तपणे गोकुळात यशोदेकडे कृष्णाला पोहोचवले. गोकुळात कृष्णाचा जन्मा झाला म्हणून लोकांनी आनंदोत्स्व साजरा केला. या दिवशी रात्री मंदिरात जन्मोत्सव आणि कथा कीर्तने होतात. वैष्णव संप्रदायात या सणाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात हा दिवस गोपाळकाला, दहीकाला म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच या दिवशी दहीहंडी फोडून साजरा करतात.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत. पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करतात.
भारताच्या विविध प्रांतात
हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजरातमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.
या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. गोकुळ, वृंदावन, मथुरा, पुरी, द्वारकादी क्षेत्रांत, कृष्णजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. वृंदावन येथे या निमित्ताने‘दोलोत्सव’ होतो.
गोपाळकाला
उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो आणि त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात आणि दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण आणि आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला आणि सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची आणि मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात आणि बघणाऱ्यांची जल्लोषासहित मोठी गर्दी जमलेली असते.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)