MPSC : कृषी सेवेच्या 258 पदांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अखेर निर्णय घेतला, प्रसिद्धीपत्रक जारी, जाणून घ्या..
MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कृषी सेवेच्या 258 पदांबाबत भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळं 25 ऑगस्टला होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत 258 पदांचा समावेश नसेल.
नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या 25 ऑगस्टला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश केला जावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. विविध राजकीय नेत्यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला होता. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील याबाबत भूमिका मांडली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या सर्व प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. महाराष्ट्र कृषी सेवेतील गट- अ, गट-ब, गट-ब कनिष्ठ या संवर्गातील 258 पदांचा समावेशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत करणं शक्य होणार नसल्याचं म्हटलं आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काय भूमिका मांडली?
महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील एकूण 258 पदांचे मागणीपत्र आयोगास दिनांक 16 ऑगस्ट, 2024 रोजी शासनाकडून प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केलेले आहे. तथापि, सदर परीक्षेसंदर्भात दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त
झाले नसल्याने, सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही, अशी भूमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मांडली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी घेण्यात येत असून सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्व तयारी झालेली आहे. प्रस्तुत परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरतीप्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांची मागणी अयशस्वी
कृषी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये 258 पदांची वाढ करावी, अशी मागणी केली होती. राजकीय नेत्यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडली होती. महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ, गट-ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) अशी एकूण 258 पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली होती. मात्र, कृषी विभागाकडून मागणीपत्र 16 ऑगस्ट रोजी देण्यात आलं.त्यामुळं आयोगानं पर त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं ट्विट
कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. pic.twitter.com/cDGcp73H1H
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 20, 2024
संबंधित बातम्या :