Police Bharti : नाशिक ते धुळे, संभाजीनगर ते अमरावती, राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; गैरप्रकार रोखण्यासाठी चोख व्यवस्था!
राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोलीस भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. एकीकडे पावसाच्या धारा कोसळत असताना दुसरीकडे पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
मुंबई : राज्यात आजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रकिया सुरू झाली आहे. त्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थी चाचणीसाठी पोहोचले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या काही जिल्ह्यांत पाऊस चालू असताना अशा स्थितीत भरती प्रक्रिया राबवणे योग्य नाही, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. मुंबईत पावसामुळे भरती प्रक्रियाचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.मात्र घाटकोपरच्या रेल्वे पोलीस मैदानात रेल्वेतील विविध पदांकरता भरती प्रक्रिया आज सुरू झालेली आहे. दुसरीकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यांतही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
अमरावतीत भरती प्रक्रियेला सुरुवात
एकीकडे चाचणीचा ताण असताना दुसरीकडे पावसाच्या धारा यामुळे परीक्षार्थींची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तर तरी अनेक जिल्ह्यांत भरती प्रक्रिया चालू झाली आहे. अमरावतीत 281 पदाच्या पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. यामध्ये अमरावती शहरासाठी 74 आणि ग्रामीण भागासाठी 207 अशा एकूण 281 जागांसाठी ही भरती होत आहे. शहरातील 74 जागांसाठी 4 हजार 789 तर ग्रामीणच्या 207 जागेसाठी 25 हजार 549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत. यादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पोलीस भरती संदर्भात कुठल्याही प्रलोभनात विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरात पोलीस भरतीला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 754 जागांसाठी पोलीस भरती सुरू आहे. यासाठी तब्बल 97 हजार 847 मुलांनी अर्ज केले आहेत. पोलीस भरतीसाठी काल रात्रीपासूनच मुलं यायला सुरुवात झाली होती. सामान्य घरातील ही मुलं असल्यामुळे ते मिळेल त्या निवाऱ्याला रात्री झोपले आणि सकाळीच पोलीस भरतीला मैदानावर हजर झाले आहेत.
भंडाऱ्यात भरती प्रक्रिया चालू, प्रक्रियेचे होणार रेकॉर्डिंग
भंडाऱ्यातील पोलीस शिपायांच्या 60 रिक्त पदासाठी आजपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 60 जागांसाठी राज्यभरातून 4 हजार 35 उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज सादर केले आहेत. भंडारा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर ही प्रक्रिया राबविली जात असून भरती पारदर्शक व्हावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इन कॅमेरा याची रेकॉर्डिंग होणार आहे. ही भरती प्रक्रिया 400 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली होत आहे.
नाशिकमध्ये 118 जागांसाठी भरती प्रक्रिया
नाशिक जिल्ह्यातही पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येथे एकूण 12000 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक शहरातील 118 आणि ग्रामीणमध्ये 32 जागांसाठी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. पोलीस भरती प्रक्रियेत उच्चशिक्षित उमेदवारांचाही समावेश आहे. नाशिक शहर हद्दीत 118 तर ग्रामीण हद्दीत 32 रिक्त पदांसाठी भरती होत आहे. या भरती प्रक्रियेत उच्चशिक्षितांसोबत माजी सैनिक, तृतीयपंथीयांचाही सहभाग आहे.
धुळ्यात 57 जागांसाठी भरती प्रक्रिया चालू
धुळे जिल्ह्यासाठी 57 जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी सुरू झाली आहे. या 57 जागांसाठी अडीच हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यात 500 हून अधिक महिलांचा देखील समावेश आहे. मैदानी चाचणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात आले असून पारदर्शकपणे ही मैदानी चाचणीची प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्णतः काळजी घेण्यात आली आहे.
अकोल्यात 195 जागांसाठी 21 हजार अर्ज
अकोल्यात पोलीस शिपाईपदाच्या 195 जागांसाठी भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. अकोल्याच्या पोलीस मुख्यालयात आज पहाटे 5 वाजतापासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. अकोल्यात 195 पदासाठी 21 हजार 853 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 16 हजार 161 पुरुष उमेदवार, तर 5 हजार 619 महिला उमेदवार तसेच एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. आज पहाटेपासून उमेदवारांची मैदानी चाचणी, कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जात आहे. 100 मीटर, 800 मीटर व 1600 मीटर धावण्याची चाचणी पारदर्शक होण्यासाठी तसेच उमेदवारांची उंची व छाती तांत्रिक मशीनद्वारे मोजली जात आहे. बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची ओळख केली जातेय. या प्रक्रियेसाठी 30 पोलीस अधिकारी व 232 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 17 हजार जागांसाठी 17 लाख अर्ज
राज्यात 19 जून पासून पोलीस भरतीला सुरूवात झालेली आहे. एकण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज केले आहेत. तुरूंग विभागातील शिपाई या पदाच्या एका जागेमागे सुमारे 207 उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून 1 लाख 98 हजार 300 अर्ज (एका जागेमागे 117) आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत. 9595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण 86 उमेदवार, असं याचं गुणोत्तर आहे. शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी 3 लाख 50 हजार 592 अर्ज (एका जागेसाठी 80 उमेदवार) आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत.
हेही वाचा :
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड