Unacademy Layoffs : आर्थिक वर्ष सुरु होण्याआधीच Unacademy चा झटका, 12 टक्के कर्मचाऱ्यांची कपात होणार
Unacademy Layoffs : आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच एडटेक स्टार्टअप अनअकॅडमीने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनी पुन्हा एकदा कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती कंपनीने गुरुवारी (30 मार्च) दिली
Unacademy Layoffs : आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच एडटेक स्टार्टअप अनअकॅडमीने (Unacademy) कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनी पुन्हा एकदा कर्मचारी कपात (Layoff) करणार असल्याची माहिती कंपनीने गुरुवारी (30 मार्च) दिली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या विद्यमान टीममधील 12 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीचे संस्थापक गौरव मुंजाळ यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मेसेजद्वारे ही माहिती दिली. "नफा कमावण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे," असं गौरव मुंजाळ यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. याआधीही कंपनीने तीन वेळा कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. अनअकॅडमीमधील कर्मचारी कपातीची ही चौथी फेरी असेल. या फेरीसह गेल्या वर्षभरात कंपनीतील 50 टक्के कर्मचारी कमी होणार आहेत.
कंपनीच्या संस्थापकाचा कर्मचाऱ्यांना मेसेज
अनअकॅडमीचे संस्थापक गौरव मुंजाळ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मेसेजद्वारे या निर्णयाची माहिती दिली. संदेशात लिहिलं आहे की, आम्ही मुख्य व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी योग्य दिशेने प्रत्येक पाऊल उचललं आहे, तरीही ते पुरेसं नाही. आम्हाला आणखी पुढे जायचं आहे. दुर्दैवाने, यामुळे आम्हाला आणखी एक कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. आम्ही आमच्या टीममधील 12 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करु, जेणेकरुन आम्ही आमचे लक्ष्य पूर्ण करु शकू आणि खर्च कमी करु.
मागील वर्षी तीन वेळा कर्मचारी कपात
एप्रिल 2022 पासून अनअकॅडमीमध्ये कपातीची सुरुवात झाली. तेव्हा 600 ते 800 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. हे सर्व कर्मचारी सेल्स आणि मार्केटिंग टीमचा भाग होते. याशिवाय एप्रिल महिन्यात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या 600 कर्मचाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर, जून 2022 मध्ये, स्टार्टअप कंपनीने परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन अंतर्गत 150 लोकांना कामावरुन काढून टाकलं. मग कंपनीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात कपात केली केली होती. त्यावेळी कंपनीने एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के म्हणजेच 350 लोकांना कामावरुन काढून टाकलं होतं. त्यादरम्यान कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांचा अॅडव्हान्स पगार देण्यात आला आणि एचआरकडून नोटीस देण्यात आली होती.
नुकतंच कामावरुन काढलेल्या कर्मचाऱ्यांना काय मिळणार?
तर ज्यांना नुकतंच काढून टाकण्यात आलं आहे त्यांना नोटीस पीरियडपर्यंतचा पगार दिला जाईल. याशिवाय एक महिन्याचा पगार वेगळा दिला जाणार आहे. जे कर्मचारी एक वर्ष कंपनीत आहेत त्यांनाही एक वर्षाचा स्टॉक इन्सेंटिव्ह मिळेल. कंपनी सहा महिन्यांसाठी स्वतंत्र वैद्यकीय विमा सुविधा प्रदान करेल, जी 30 सप्टेंबरपर्यंत वैध असेल.
हेही वाचा
Disney कंपनीकडून मोठी नोकरकपात, पुढील महिन्यात 4000 नोकरदारांना हटवण्याची तयारी