(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एल्गार परिषदेचा तपास एनआयए करणार, शरद पवारांवर केंद्र सरकारची कुरघोडी?
एल्गार परिषदेचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं आहे.
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार आहे. केंद्रीय गृहखात्याने याबाबत राज्य सरकारला कळवलं आहे. विशेष म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरणी एसआयटीची स्थापना करा अशी विनंती करणारं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. मात्र त्याआधीचं केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं आहे. अशारितीने राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असं चित्र निर्माण झालं आहे.
मागच्या सरकारचा खोटेपणा बाहेर येऊ नये आणि तो लपवण्यासाठी केंद्र सरकारने तपास स्वत:कडे वळवला आहे. राज्य सरकारने आक्षेप घ्यावा अशी विनंती सरकारला करणार आहे, असा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
राज्य सरकारला विश्वासात न घेता एनआयएकडे ही केस का वळवली जात आहे, हे संशयास्पद आहे. लोकशाहीचा अपमान करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. एनआयए जो तपास करणार आहे, तोच तपास एसआयटीने केला असता. तीन वर्षांनंतर केंद्र सरकारला जाग का आहे, असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
एसआयटी चौकशीची शरद पवारांची मागणी
कोरेगाव भीमा प्रकरणात पोलिसांना हाताशी धरुन भाजप सरकारने जाणूनबुजून डाव्यांना टार्गेट केल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून, त्यांनी एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी केली आहे. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धीजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेलं षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. तसेच यासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शरद पवारांनी पत्रात काय म्हटलंय?
"पोलिस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या याची खोलात जाऊन चौकशी आवश्यकता आहे. कोरेगाव भीमा दंगलीला एल्गार परिषदेतील चिथावणीखोर जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामधील काही जणांचा माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरुन कारवाई करण्यात आली. कारवाई झाली त्यात ही बुद्धीजीवी आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. म्हणून याप्रकरणी एसआयटी नेमावी," असं शरद पवार यांनी पत्रात लिहिलं आहे.
शरद पवार यांनी पुढे लिहिलं आहे की, "अटक झालेल्या सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची अनुवादीत कविता वाचल्यामुळे त्यांना अटक केली. तर डॉ. आनंद तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. 'गोलपीठा'मध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ती साहित्यिक अर्थाने बोध घेण्याऐवजी ते देशद्रोह आणि समाजविघातक म्हणून निष्कर्ष काढू नये." संबंधित बातम्या- कोरेगाव भीमा दंगल हे तत्कालीन सरकारचं षडयंत्र, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- Bhima-Koregaon | भीमा-कोरेगावबाबत पुरावे समोर ठेवले जातील, कारवाई पुराव्यांच्या आधारेच झाली - दीपक केसरकर
- एल्गार परिषद, कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, पुणे पोलीस अडचणीत
- एल्गार परिषदेशी संबंधित दहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल