Usha Naik On FilmFare : माझ्यामुळे मराठी कलाकारांना फिल्मफेअर देणं बंद झालं होतं, पण रितेशने..., उषा नाईकांनी नेमकं काय म्हटलं?
Usha Naik On FilmFare : अभिनेत्री उषा नाईक यांनी फिल्मफेअर पुरस्कारांविषयी भाष्य करत मराठी कलाकारांना त्यांच्यामुळे फिल्मफेअर देणं बंद झाल्याचा खुलासा केला आहे.
Usha Naik On FilmFare : सिनेसृष्टीत पुरस्कारांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्यातच फिल्मफेअर पुरस्कार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक दिग्गजांना या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कार्याचा गौरव हा पुरस्कार देऊन नेहमीच केला जातो. आपलं घरदार सांभाळून हे कलाकार नेहमीच त्यांच्या कामाला प्राधान्य देतात. याच फिल्मफेअर पुरस्काराविषयी अभिनेत्री उषा नाईक (Usha Naik) यांनी एक अनुभव सांगितला आहे.
इट्स मज्जा या वेबपोर्टला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान उषा नाईक यांनी हा खुलासा केला आहे. खरंतर फिल्मफेअर पुरस्कार मिळणं ही प्रत्येकाला त्याच्या कामाची मिळालेली पोचपावती असते. उषा नाईक यांना नुकताच व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. पण या पुरस्काराविषयी बोलताना त्यांनी फिल्मफेअर पुरस्काराविषयी भाष्य केलं आहे.
उषा नाईक यांनी काय म्हटलं?
मला जेव्हा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझा माझा मुलगा आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. ते सोडून जाणं मला शक्य नव्हतं. मी तो पुरस्कार घ्यायला गेले नव्हते म्हणून त्यावेळी मराठी कलाकरांना फिल्मफेअर देणं बंद केलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं, की आम्ही मराठी कलाकरांना पुरस्कार देतो, पण ते पुरस्कार घ्यायला येत नाहीत. पण रितेश देशमुख यांनी मराठी कलाकरांना स्वतंत्र्यपणे हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली. त्या सोहळ्याला मी गेले होते. त्यावेळी तिथेही मी हे बोलून दाखवलं. मराठी कलाकारांना माझ्यामुळे फिल्मफेअर देणं बंद झालं होतं, पण रितेश देशमुख यांच्यामुळे ते पुन्हा सुरु झालं.
काम करताना माझ्यावर बराच अन्याय झाला - उषा नाईक
या क्षेत्रात काम करताना माझ्यावर बराच अन्याय झालाय. पण ते सगळं एक हजाराच्या नोटने भरुन काढलं. तेव्हा जवळपास मला 15 ते 16 अॅवॉर्ड्स मिळाले होते. मला काम चागलं कसं करावं हे माहित होतं, पण आता अॅवॉर्ड मिळणं किंवा न मिळणं हा नशिबाचा भाग नाही तर प्रेक्षकांच्या मर्जीचा भाग आहे, याची जाणीव मला कालांतराने झाली, असंही उषा नाईक यांनी यावेळी म्हटलं आहे. उषा नाईक यांनी मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना अनेक दर्जेदार चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना दिली आहे.