Timepass 3 Controversy: टाईमपास 3 च्या निर्माता-दिग्दर्शकामध्ये वादाची ठिणगी, कायदेशीर नोटिशीमुळे वाद उजेडात
निर्मात्यांनी वृत्तपत्रात दिलेल्या नोटिशीनुसार टाईमपास 3 च्या सर्व आशयावर कायदेशीररित्या आपला हक्क असल्याचा दावा ते करतात.
दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी लोकांनी डोक्यावर घेतली. टाईमपास, टाईमपास 2 या दोन्ही चित्रपटांना रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. म्हणून या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी याच्या तिसऱ्या भागाची जुळवाजुळव सुरू केली. आताशी चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे. काही अंश बाकी असतानाच चित्रपटाचे निर्माते असलेल्या मौर्य फिल्म्स एंड एंटरटेन्मेंट आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्यात असलेला वाद समोर आला आहे. निर्मात्यांनी वृत्तपत्रात दिलेल्या नोटिशीनुसार टाईमपास 3 च्या सर्व आशयावर कायदेशीररित्या आपला हक्क असल्याचा दावा ते करतात.
ही नोटिस निर्माते मौर्य फिल्म्स एंड एंटरटेन्मेंट यांचे वकिल दिनेश अडसुळे यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मौर्य फिल्म्स आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या टाईमपास 3 चित्रपटाबद्दल 3 नोव्हेंबर 2020 मध्ये एमओयू झाला होता. त्यानुसार सध्या बनलेल्या टाईमपास 3 च्या सर्व प्रकारच्या आशयावर मौर्यचा हक्क असल्याचं ते म्हणतात. यात पटकथा, साऊंड ट्रॅक, ब्रँड नेम्स आदी सगळ्यावर मौर्यचा हक्क असल्याचं ते सांगतात. शिवाय, रवी जाधव यांना ठरल्यानुसार या चित्रपटासाठी पैसे दिल्याचा उल्लेखही या नोटिशीत करण्यात आला आहे.
टाईमपास 3 ची ही सर्व प्रॉपर्टी वापरण्याचा हक्क मौर्यचा असून, इतरत्र हे वापरलं गेल्यास त्याची रॉयल्टीही त्यांना मिळणे क्रमप्राप्त आहे याचा उल्लेखही या नोटिशीत आहे. टाईमपास 3 चे सर्वाधिकार मौर्यकडे असून इतर कुणासही त्याचा वापर करायचा असेल तर आपल्या अशिलांकडून त्याची लेखी परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. असे काही व्यवहार झाल्याचं आढळल्यास कायदेशीर कारवाईही केली जाईल असंही यात सांगण्यात आलं आहे. या नोटिशीमुळे टाईमपास 3 समोर नव्या अडचणी उद्भवल्या आहेत. मौर्य फिल्म्सशी संपर्क साधला असता, रवी जाधव यांनीही वकिलामार्फत निर्मात्यांना यापूर्वी नोटिस पाठवल्याचा उल्लेख त्यांनी केला. एकूणात निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यातल्या बेबनावामुळे टाईमपास 3 पेचात अडकला आहे. याबाबत रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.