(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ti Majhi Premkatha : प्रेम आणि विश्वासाचं अनोख उदाहरण, 'ती माझी प्रेमकथा' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Ti Majhi Premkatha : प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला, तर त्या प्रेमाचे पुढे काय होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
Ti Majhi Premkatha : आयुष्यात प्रत्येकजण एकदा का होईना प्रेमात पडतोच. तर प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही निरनिराळी असते, काहींचे प्रेम हे सफल होते, तर काहींना प्रेमात यातना सहन कराव्या लागतात. प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला, तर त्या प्रेमाचे पुढे काय होते हे 'फिल्मी टाईम प्रोडक्शन' सह आणि 'कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट' सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुकव्वर निर्मित 'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha) या प्रेममय चित्रपटातून येत्या 30 सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे. एकुणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून, आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश आहे. नुकतेच या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीस आले आहे.
अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते या नव्या कोऱ्या जोडीने 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. पद्मिनी आणि तुषारची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नवोदित कलाकारांनी या चित्रपटात प्रेमाचे काय रंग उधळलेत हे पाहणे या चित्रपटात खरंच रंजक ठरेल. विशेष म्हणजे या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये ही झळकणार आहेत, तर भोंगा फेम कपिल कांबळे या चित्रपटात तुषारच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे.
काय आहे कथानक?
एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत प्रेमाच्या बंधनात अडकत गेल्यानंतर काही कालावधीने संशय आणि अविश्वासाने मारलेली उडी त्या प्रेमाचा अंत करते की, ते प्रेम अविश्वासाला थारा देत नाही हे 'तू माझी प्रेमकथा' या चित्रपटात पाहणे रंजक ठरणार आहे. सिद्धू आणि रेणूची जोडगोळी या चित्रपटात एक आगळी वेगळी कथा मोठ्या पडद्यावर आणणार आहे. पोस्टरवरील नवोदित कलाकारांचा फर्स्ट लूक प्रेमाच्या रंगात आणखीनच खुलून आला असल्याचे दिसत आहे. येत्या 30 सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
दिग्दर्शक सूर्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदाऱ्या उत्तम पेलवल्या आहेत. तर या चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारी कपिल जोंधळे यांनी सांभाळली आहे. तर या रोमँटिक चित्रपटाच्या संगीताची धुरा राजवीर गांगजी याने पेलवली.
हेही वाचा :