(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Purushottam Karandak : 'दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं' ; विजू माने यांनी व्यक्त केला संताप
प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी एका पोस्ट शेअर करुन पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेच्या परीक्षकांचे कान टोचले आहेत.
Purushottam Karandak : पुरुषोत्तम करंडक (Purushottam Karandak) ही प्रसिद्ध नाट्य स्पर्धा सध्या चर्चेत आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय आढळून आलेला नाही, असं म्हणत यंदा स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता अनेक लोक या स्पर्धेचा आणि परीक्षकांच्या निर्णयाचा निषेध करत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाटकाला चांगली एकांकिका निवडून त्यांना करंडक जाहीर करायला हवा होता, असं अनेकांचे मत आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी एका पोस्ट शेअर करुन पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेच्या परीक्षकांचे कान टोचले आहेत.
'असे परीक्षक मी एकांकिका करत असतानाही होते': विजू माने
विजू माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'निषेध! मी ही स्पर्धा पाहिलेली नाही त्यामुळे एकांकिकांच्या दर्जाबद्दल मी बोलू शकत नाही, परंतु या वृत्तीचा मला कायम राग येतो. एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत धावणारे पाच जण असतील तर त्यात सगळ्यात पुढे असेल तो पहिला येणं हे सामान्य स्पर्धेतले लॉजिक इथे का लावलं जात नाही? मुळात अमुक एक दर्जा असलेल्या एकांकिका हव्या आहेत असं जर परीक्षकांना वाटत असेल, तर त्यांनी प्राथमिक फेरीतच दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं. म्हणजे दिवस-रात्र प्रयत्न करणाऱ्यांचा विनाकारण हिरमोड होणार नाही. एकांकिका करणाऱ्या मुलांना उगाच 'नाडण्याची करणी' करणारे असे परीक्षक मी एकांकिका करत असतानाही होते. तेव्हा सुद्धा माझं हेच मत होतं. ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे त्या लोकांमधला जो उत्तम आहे त्याला पहिला क्रमांक द्या.'
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही तरी तुमच्या शाळेत 100 पैकी 100 मार्क कधी मिळवले होते का? पण म्हणून एखाद्या वर्गात 65 मार्क मिळवणारा मुलगा सर्वोच्च मार्क मिळवणारा असेल तर त्याला पहिला क्रमांक द्यायचा नाही याला काय अर्थ आहे. मला तेव्हाही असं वाटायचं की आधी परीक्षकांची नावं जाहीर करा. मग आम्ही तशी एकांकिका सादर करू. दिवस काही फार बदललेले नाहीत.'
यंदा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचं परीक्षण परेश मोकाशी, हिमांशु स्मार्त आणि पौर्णिमा मनोहे यांनी केले होते. ही स्पर्धा 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन 23 सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे करण्यात आलं आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Purushottam Karandak : अरेच्चा हे काय... यंदाचा पुरुषोत्तम करंडकाचा मान कोणालाच नाही!