Gharat Ganpati : पदार्पणातच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान, 'इफ्फी'मध्ये ‘घरत गणपती’ चित्रपटाचा गौरव
Gharat Ganpati : इफ्फी पुरस्कार सोहळ्यामध्ये घरत गणपती सिनेमाचा गौरव करण्यात आला आहे.
Gharat Ganpati : इफ्फी पुरस्कार सोहळ्यामध्ये घरत गणपती या सिनेमाचा गौरव करण्यात आला आहे. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2024) ‘भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार’ विभागात ‘घरत गणपती’ (Gharat Ganpati) या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर (Navjot Bandivdekar) यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गोव्यात संपन्न झालेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी)भारतीय फिचर चित्रपट पुरस्काराच्या यादीत पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण हा विभाग जाहीर करण्यात आला. या पुरस्कारासाठी सात चित्रपट स्पर्धेत होते. पुरस्काराच्या या स्पर्धेत ‘ घरत गणपती’ चित्रपटाने आपली मोहोर उमटवली.
सिनेमाचं विविध स्तरावर बरंच कौतुक होतंय - नवज्योत बांदिवडेकर
‘पहिल्याच चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद व पुरस्काराची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी व्यक्त केली. एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखविले, त्या चित्रपटाचं आज विविध स्तरावर खूप कौतुक होताना दिसतंय’, अशी प्रतिक्रिया यावेळी नवज्योतने दिली.
तगडी स्टारकास्ट असलेला 'घरत गणपती'
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.
प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट
'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. जो प्रत्येकाच्या मनाला भावेल, त्यामुळेच पॅनोरमा स्टुडिओज ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या सोबत भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.
View this post on Instagram