Zee Marathi : 'प्रिय प्रेक्षकहो...काळजात काय काय उचंबळून येतंय...', 25व्या वर्षाच्या प्रवासानंतर 'झी मराठी'चं खास पत्र
Zee Marathi : झी मराठी पुरस्कार सोहळ्यांच्या मंचावर प्रेक्षकांसाठी खास पत्राचं वाचन करण्यात आलं.
Zee Marathi : आभाळमाया,वादळवाट, असंभव अशा अनेक अजरामर मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करतायत. झी मराठी वाहिनीने आतापर्यंत अशा अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. त्यामुळे झी मराठीसोबत (Zee Marathi) प्रेक्षकांचं फार जुनं नातं आहे. त्याच नात्यासाठी झी मराठीने त्यांच्या प्रेक्षकांच्या 25 वर्षांच्या प्रवासासाठी धन्यवाद म्हटलंय.
झी मराठीकडून प्रेक्षकांना खास पत्र लिहिण्यात आलं आहे. संकर्षण कऱ्हाडेने या पत्राचं वाचन यावेळी झी मराठीच्या मंचावर केलंय. पार पडलेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये वाहिनीवरील अनेक जुन्या आणि अजरामर मालिकांचा यथोचित सन्मानही करण्यात आला. या वाहिनीसोबत आभाळामायेचीही 25 वर्ष पूर्ण झाली आहे. त्याचंही सेलिब्रेशन यावेळी मंचावर करण्यात आलं.
झी मराठीचं खास पत्र
झी मराठीच्या पत्रात म्हटलं की, 'प्रिय प्रेक्षकहो...25 वर्ष एवढी मोठी गोष्ट आहे. आता काळजात काय काय उचंबळून येतंय हे सांगणं कठीण आहे. आयुष्याचा हा एका असा प्रवास आहे जो आपण एकत्र सुरु केला होता, आज त्याच प्रवासाने पंचवीशी गाठली आहे. आज 25 वर्षांनी मनात हा विचार येतोय की,आपण या दोघांमधलं नात म्हणजे नेमकं काय नातं आहोत? मी तुमची सकाळ जागवणारा वासुदेव आहे,मी तुमचा न्याहारीचा डब्बा भरुन देणारा साथीदार आहे...का दुपारी ऊन डोक्यावर आलं तर शांत निजवणारी आई आहे..'
'संध्याकाळी तुमच्यासोबत बागडणारा उनाड सवंगडी आहे...का बागडून झालं की घरी परत आणणारे आजोबा आहे..अभ्यासाला बसवणारा बाप आहे..का रात्री गोष्ट सांगत शांत निजवणारी आज्जी आहे..उत्तर हे आहे की, आपल्यातलं नातं हे यातलं सगळंच थोडं थोडं आहे...या 25 वर्षात तुम्ही गोष्टी बघताना तुम्ही हसला असाल,लाजला असाल,तुमच्या डोळ्यांच्या कडाही पाणवल्या असतील..पण आपण प्रत्येक भावनेचा केला सोहळा, प्रत्येक भावना सोबतीने जगलो..आम्ही नवीन गोष्टींना कायम तुमच्या समोर घेऊन येत राहू..काय असतं गोष्टींना कान मिळाले,नुसते कान नाही,गोष्टींना ऐकणारे कान मिळाले की, गोष्टींमधली पात्र श्वास घेत राहतात आणि तो श्वास तुम्ही आहात.. हा श्वास निरंतर चालू राहू दे हिच निर्मिताकडे प्रार्थना करतो,मनापासून खूप मनापासून खूप खूप धन्यवाद... तुमचीच लाडकी वाहिनी झी मराठी...'
View this post on Instagram