एक्स्प्लोर
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
'एबीपी माझा'ने कोल्हापुरातील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या सेटवर भेट दिली. यावेळी केलेल्या एक्स्क्लुझिव्ह बातचीतदरम्यान हार्दिकने अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
कोल्हापूर : 'अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,' हे वाक्य आहे 'तुझ्यात जीव रंगला' फेम पैलवान राणा अर्थात हार्दिक जोशीचं. 'एबीपी माझा'ने कोल्हापुरातील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या सेटवर भेट दिली. यावेळी केलेल्या एक्स्क्लुझिव्ह बातचीतदरम्यान हार्दिकने अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने अवघ्या वर्षभरात प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. साधा-भोळा, लाजरा-बुजरा पैलवान राणा अनेकांना आवडतो. प्रेक्षक राणा आणि पाठकबाईंच्या अक्षरश: प्रेमात आहेत. परंतु राणाची भूमिका साकारणाऱ्या हार्दिकचं अभिनयात करिअर करणं हे स्वप्न कधीच नव्हतं. हार्दिकला आर्मीत करिअर करण्याचं स्वप्न होतं.
अजूनही आर्मीत जाण्याची इच्छा
"कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करायचो. पण त्यात करिअर करण्याचा विचार केला नव्हता. मला खरंतर आर्मीत करिअर करायचं होतं. 2011 मध्ये माझी आर्मीत निवड झाली होती. मी चंदीगडमध्ये एसएसबीचं (सशस्त्र सीमा दल) ट्रेनिंगही केलं होतं. पण काही कारणामुळे मला कॉल आला नाही. मात्र अजूनही आर्मीत जाण्याची माझी इच्छा आहे," असं हार्दिक म्हणाला.
मुंबईतील अॅन्टॉप हिलमधील बालपण
हार्दिक जोशी मूळचा मुंबईचा आहे. अॅन्टॉप हिलमध्ये त्याचं बालपण गेलं तर किंग जॉर्ज शाळेत त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानतंर खालसा कॉलेजमध्ये पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असताना त्याने मॉडेलिंग केलं. त्याने 'रंगा पतंगा' यासरख्या सिनेमात पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. तसंच अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
2010 पासून इंडस्ट्रीत
"मी 2010 पासून इंडस्ट्रीत आहे. कॉलेजमध्ये असताना मी मॉडेलिंग करायचो. पण त्यात करिअर करण्याची इच्छा नव्हती. कॉलेजमधील अक्टिव्हिटी म्हणून मी मॉडेलिंग करायचो. एसएसबीमध्ये निवड न झाल्याने मी परत आलो आणि फोटोशूट केलं. त्यावेळी काही छोट्या-मोठ्या भूमिका मिळत गेल्या," असं हार्दिकने सांगितलं.
राणाचा खुराक
मालिकेत पैलवान राणा तालमीत घाम गाळतो, कसरत करतो. पैलवान असल्यामुळे त्याचा खुराकही तेवढाच तगडा असतो. राणाच्या भूमिकेसाठी राणाला भाषेसोबतच त्याच्या डाएटवर बरीच मेहनत करावी लागली. पैलवान राणा साकारण्यासाठी तो दिवसाला 20 अंडी आणि अर्धा ते पाऊण किलो चिकन असा खुराक नेहमी खातो. याशिवाय, सॅलड, प्रोटिनचाही त्याच्या खाण्यात समावेश असतो.
वरण, भात आणि बटाट्याच्या काचऱ्या
राणाची भूमिका खरी वाटावी यासाठी हार्दिक अंडी आणि चिकनचा खुराक घेत असला तरी त्याचं आवडता डिश म्हणजे वरण, भात आणि बटाट्याच्या काचऱ्या. हार्दिकला एवढं साधं जेवण आवडतं यावर कोणालाही विश्वास बसणार नाही, पण त्याला घरचं जेवणच जास्त आवडतं. "सुट्टीत कधी घरी गेलो तर आईकडे वरण, भात, तूप, लोणचं आणि बटाट्याची काचऱ्या अशी खास फर्माईश असते. आता आईलाही याची सवय झाल्याने काय बनवायचं हे तिला सांगावं लागत नाही," असं हार्दिक सांगतो.
न चुकता व्यायाम
फक्त डाएटच नाही तर राणाच्या भूमिकेसाठी हार्दिक व्यायामावरही विशेष लक्ष देतो. दिवसभराचं चित्रीकरणानंतर कितीही दमलेलो असलो तरी न चुकता दरदिवशी एक तास व्यायम करतोच, असं हार्दिकने सांगितलं. सगळ्यांनीच किमान एक तास व्यायामासाठी काढा. यामुळे फ्रेशनेस येतो, पॉझिटिव्हिटी मिळते, असं तो म्हणाला.
भाषेवर अधिक मेहनत
मूळचा मुंबईकर असलेला हार्दिक जोशीला मालिकेसाठी भाषेवर अधिक मेहनत करावी लागली. मालिकेची पार्श्वभूमी कोल्हापुरातील असल्यामुळे त्याला तिथला लहेजा आत्मसात करावा लागला. हार्दिक म्हणाला की, "भाषा लिहून किंवा वाचून येत नाही. शूटिंग सुरु होण्याआधी पाच दिवस आधी गावात आलो. तिथल्या लोकांशी संवाद साधून तो लहेजा शिकलो. गावातले लोक, स्पॉट बॉय, डायरेक्टर या सगळ्यांच्या मेहनतीमुळे ती भाषा शिकलो. आता तुम्ही चांगलं कोल्हापुरी बोलता, अशा प्रतिक्रिया ऐकून लय भारी वाटतं"
सेटवर जत्रेचं वातावरण
राणा आणि पाठकबाईंची क्रेज किती आहे, याचा प्रत्यय सेटवर गेल्यावर येतोच. शनिवार आणि रविवारी सेटवर अक्षरश: जत्रेचं स्वरुप असतं. आजूबाजूच्या गावांपासून, सातारा, पुणे, मुंबईतील चाहते राणा आणि अंजलीच्या भेटीसाठी सेटवर येतात. त्यांची एक झलक मिळवण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तुफान गर्दी होते. त्यामुळे राणा आणि अंजली अर्थात हार्दिक आणि अक्षया दर रविवारी एकदा बाहेर येऊन चाहत्यांना भेटतात. महानायक अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे आठवड्याचा एक दिवस 'जलसा'मधून चाहत्यांना एक झलक देतात, तसाच फील इथल्या सेटवर असतो.
चाहत्यांचं प्रेम
मालिकेमुळे प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे मी अतिशय भारावलो आहे. इथे मला राणा दाच म्हणून हाक मारतात. त्यांचं प्रेम पाहून कधीतरी डोळे भरुन येतात. काही जण भेटण्यासाठी दोन दोन दिवस वाट पाहतात. तर काही जणांना माझ्यात त्यांचा मुलगा दिसतो. हे सगळं अतिशय भारी वाटतं, हे सांगताना हार्दिक जोशीच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement