Sachin Goswami On Suresh Wadkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा सुरेश वाडकरांना टोला, तुजं नमो गायक...
Sachin Goswami On Suresh Wadkar : पंतप्रधान मोदींबाबत आणि राजकीय स्थितीबाबत सुरेश वाडकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून गोस्वामी यांनी वाडकरांना टोला लगावला.
Sachin Goswami On Suresh Wadkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना टोला लगावला आहे. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी वाडकरांवर उपरोधिक टीका केली आहे. सुरेश वाडकर यांनी सोमवारी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत आणि राजकीय स्थितीबाबत केलेल्या वक्तव्यावरून गोस्वामी यांनी वाडकरांना टोला लगावला.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) हे आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठीदेखील ओळखले जातात. सामाजिक-राजकीय प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रावर केलेल्या हल्ला प्रकरणावर भाष्य केले होते. त्यानंतर आता, सचिन गोस्वामी यांनी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यावर टीका केली आहे.
सचिन गोस्वामी यांनी काय म्हटले?
सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,पुढील "महाराष्ट्र भूषण"
(तुजं नमो गायक) सुरेश वाडकर.....एक अंदाज. अशी पोस्ट त्यांनी लिहिली.
सचिन गोस्वामी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टला दाद दिली आहे. एका युजरने म्हटले की, वाडकर जर दर वेळी असे काही बोलू राहिले तर भारतरत्न पण मिळेल. तर, एका युजरने सर, तुमचा अंदाज चुकूच शकत नाही असे म्हटले. दाढी वाढवावी की कुरळवावी .....एकच प्रश्न असा उपरोधिक सवालही एका युजरने केला.
सुरेश वाडकर नेमकं काय म्हणाले होते?
शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर सुरेश वाडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी सुरेश वाडकर यांनी मी गाणं वाजवणारा माणूस आहे. मला राजकारणातलं काही कळत नाही. पण साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सर्वकाही चांगलं करणार. मला वाटतं देवी-देवतांनीच पंतप्रधान मोदींची नेमणूक केली आहे, असे वक्तव्य केले. सुरेश वाडकर यांनी केलेल्या या वक्तव्यावरूनच त्यांच्यावर टीका सुरू असल्याचे म्हटले जात आहे.