Prabhakar More: हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश; सांस्कृतिक कोकण विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी
प्रभाकर मोरे (Prabhakar More) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
Prabhakar More: प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे (Prabhakar More) यांनी राष्ट्रवादीमध्ये (Nationalist Congress Party) प्रवेश घेतला आहे. त्यांना सांस्कृतिक कोकण विभागाच्या अध्यक्ष पादाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रभाकर मोरे (Prabhakar More) यांनी केलं काम
प्रभाकर मोरे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. प्रभाकर मोरे हे आपल्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. पांघरुण, टकाटक, कुटुंब (2012), कट्टी भट्टी (2015), बाई गो बाई (2015) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन (Comedychi Bullet Train), महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमांमधील प्रभाकर मोरे यांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. भाई-व्यक्ती की वल्ली (Bhai: Vyakti Ki Valli) या महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या चित्रपटामध्ये देखील प्रभाकर यांनी काम केलं. हा चित्रपट 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'धोंडी चंप्या : एक प्रेम कथा' (Dhondi Champya - Ek Prem Katha) या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले. या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 16 डिसेंबर 2022 रोजी हा चित्रपट रिलीज झाला. पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेमध्ये देखील प्रभाकर मोरे यांनी काम केलं आहे. या मालिकेत प्रभाकर मोरे यांच्या व्यतिरिक्त अभिनेता मकरंद अनासपुरे आणि समिर चौघुले यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
'या' कलाकारांची राजकारणात एन्ट्री
प्रभाकर मोरे (Prabhakar More) यांच्या आधी अनेक कलाकारांनी राजकारणात एन्ट्री केली. अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Arun-Berde), अभिनेता आनंद शिंदे (Anand Shinde ) यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तसेच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी देखील काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. गायिका देवयानी बेंद्रे यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :