Nilesh Sable New Comedy Show : निलेश साबळे पुन्हा विचारणार, "हसताय ना? हसायलाच पाहिजे"; पण चॅनल मात्र नवं अन् सोबतचे सवंगडीही नवेच
Nilesh Sable New Comedy Show : निलेश साबळे पुन्हा एकदा नवा कॉमेडी शो घेऊन येत आहे. निलेश साबळे “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” हा नवा शो घेऊन येणार आहे.
Nilesh Sable New Comedy Show : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवरून 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याआधी या कॉमेडी शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली होती. डॉ. निलेश साबळेने (Dr. Nilesh Sable) शो सोडल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र, आजारपण आणि इतर काही कारणांनी शो सोडला असल्याचे निलेश साबळे यांनी सांगितले होते. मात्र, निलेश साबळे पुन्हा एकदा नवा कॉमेडी शो घेऊन येत आहे. निलेश साबळे “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” हा नवा शो घेऊन येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर हा शो 20 एप्रिल पासून सुरू होणार आहे.
‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडणार आहे. डॉ. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची नवी सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठीवर धावणार आहे. डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांचे अनेक दिवाने आहेतच पण बॅालीवूडमध्येही डॅा निलेश साबळे यांनी सगळ्या सुपरस्टार्सना आपल्या कॅामेडीचे जबरदस्त फॅन केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत.
नव्या कॉमेडी शोमध्ये कोणते नवे कलाकार?
डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदवीर शो मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे.
तर या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये असणार आहेत.''हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' हा शो कलर्स मराठीवर 20 एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.