Bigg Boss Marathi 4 Exclusive : न्यूज अॅंकर ते बिग बॉस; 'बिग बॉस'च्या आवाजामागचा खरा चेहरा 'माझा'वर
Ratnakar Tardalkar : बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा व्हाईस आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर यांचा आहे.
Bigg Boss Marathi 4 Exclusive : बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला (Bigg Boss Marathi 4) आजपासून सुरुवात होणार आहे. पण बिग बॉसच्या घरात दिल्या जाणाऱ्या आदेशांना कोणाचा आवाज दिला आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा व्हाईस आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर (Ratnakar Tardalkar) यांचा आहे.
बिग बॉसचा आवाज महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा आवाज ऐकत आहेत. पण या आवाजामागचा चेहरा आजवर कोणाला माहित नव्हता. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दोन पर्वांना रत्नाकर तारदळकर यांचा आवाज लाभला आहे.
'बिग बॉस' करतानाची वेगळी जबाबदारी
रत्नाकर तारदळकर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,"बिग बॉसच्या घरातला 'बिग बॉस' हा मुख्य माणूस असून त्याच्याकडे सर्व पाहुणे राहायला आले आहेत. त्यामुळे आदेश हुकुमी वाटत असले तरी त्यात आदर आहे. त्यादृष्टीने तो आवाज येणं गरजेचं आहे. त्यामुळे बिग बॉस करताना एक वेगळी जबाबदारी होती.
बिग बॉसचं पडद्यामागचं काम
रत्नाकर तारदळकर म्हणाले, "बिग बॉस मला 24 तास पाहावं लागतं. सकाळी 10 वाजता स्पर्धकांना टास्क देण्यापासून सुरुवात होते. त्यानंतर तो टास्क पूर्ण होईपर्यंत कुठे जाऊ शकत नाही. टास्क संपण्याची वेळ ठरलेली नसते. सकाळी 10 वाजता सुरू झालेला टास्क दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजतादेखील संपू शकतो. टास्कदरम्यान स्पर्धकांना मार्गदर्शन करावं लागतं. अनेकदा मध्यरात्रीदेखील स्पर्धकांची भांडणं झाल्यावर पुन्हा एकदा सेटवर यावं लागतं. मनाने बिग बॉसच्या घरातच राहवं लागत होतं. कोणाचा फोन घेऊ शकत नाही.
बिग बॉसची ऑडिशन कशी झाली?
रत्नाकर तारदळकर पुढे म्हणाले,"बिग बॉससाठी ऑडिशन घेण्यात आली होती. त्यांना आश्वासक आवाज हवा होता. बिग बॉसचा आवाज माझा आहे हे सर्वांपासून लपवणं माझ्यासाठी कठीण होतं. सार्वजनिक ठिकाणी काही म्हणालो तरी लोक म्हणायचे हा आवाज कुठेतरी ऐकला आहे. बिग बॉस हा कार्यक्रम वेगळा आहे. या कार्यक्रमात मानसिकता जपली जाते. आदेश देण्यासोबत स्पर्धकांसोबत संवाददेखील साधावा लागतो ".
संबंधित बातम्या