(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Savaniee Ravindrra | माय-लेकीचा हळवा बंध, गायिका 'सावनी रविंद्र'ने लेक शार्वीसाठी गायली 'लडिवाळा’ अंगाई!
Savaniee Ravindrra : राष्ट्रीय पुरस्कार विजेती, सुमधुर गळ्याची गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) हीने तिच्या चिमुकल्या लेकीसाठी म्हणजेच शार्वीसाठी 'लडिवाळा' ही सुरेल अंगाई गायली आहे.
Savaniee Ravindrra New Song : राष्ट्रीय पुरस्कार विजेती, सुमधुर गळ्याची गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) हीने तिच्या चिमुकल्या लेकीसाठी म्हणजेच शार्वीसाठी 'लडिवाळा' (Ladiwala) ही सुरेल अंगाई गायली आहे. या अंगाई गीताचे बोल गीतकार वैभव जोशी यांनी लिहीले आहेत. तर, या गीताचे संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी हे आहेत. सावनीच्या चाहत्यांनी या अंगाई गीताला भरघोस प्रतिसाद दिला आहे.
गायिका सावनी रविंद्र या अंगाई गीताविषयी बोलताना म्हणते की, “आई आणि अंगाई हे एक अलौकिक समीकरण आहे असं मला वाटतं. आई ही गायिका नसली तरीही आईची जी भावना आहे, ती आपल्या बाळासाठी अंगाईच्या रुपात नेहमीच उत्प्रेरक वाहत असते आणि मग जर गायिका आई असेल तर ती अंगाई गाण्यापासून दूर कशी राहील. जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नंट आहे, तेव्हाच मनाशी ठरवलं की माझ्या बाळासाठी एक खास गाणं करायला हवं.”
त्याने माझ्या मनातलं ओळखलं!
सावनी म्हणते की, “सिंगिंग स्टारचं पर्व झाल्यापासून सलीलदादा आणि माझ्या मनात एकत्र कुठलं तरी गाणं करावं हा विचार होताच. त्यातच मी गुड न्यूज द्यायला जेव्हा त्याला फोन केला तेव्हा आपसूकच तो बोलून गेला की, सावनी आपण अंगाई करूया? आणि अक्षरशः त्याने माझ्या मनातलं ओळखलं. त्यानंतर माझा लाडका भाऊ वैभव जोशी याला मी फोन केला. त्यावर दादा मला म्हणाला, सावनी तुला काय गिफ्ट हवंय? तू आता आई होणार आहेस... मी म्हटलं, दादा माझ्यासाठी एक अंगाई गीत तयार कर. हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल."
पाहा गाणं
सावनी अंगाई गीताच्या रेकॉर्डिंग दरम्यानचा किस्सा सांगताना म्हणाली, “जेव्हा वैभव दादाने माझ्यासाठी अंगाई गीत लिहिलं तेव्हा मला माहित नव्हतं की, माझ्या पोटी मुलगी आहे की मुलगा. त्यामुळे या गाण्याचे शीर्षक लडिवाळा असे मी ठेवले. निज बाळा लडिवाळा, रंगला अंबरी चांदणं सोहळा... वैभव दादाने गाण्याचे बोल अतिशय सुंदर लिहिले आहे. मी जेव्हा पहिल्यांदा हे गाणं गायलं. तेव्हा आपसूकच माझ्या बाळाने पोटातल्या पोटात हात पाय हलवून मला जाणीव करून दिली की,बाळालाही अंगाई आवडली आहे. अंगाई गाणं जेव्हा मी रेकॉर्ड केलं तेव्हा नुकताच मला नववा महिना लागला होता आणि ते क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल होते. ही अंगाई आम्ही मराठी आणि बंगाली या दोन भाषांमध्ये तयार केली आहे. सलील दादाची इच्छा होती की अंगाई इतका गोड आणि मधाळ असा गीतप्रकार आहे, त्यामुळे बंगाली भाषेत ही अंगाई यावी. सुरुवातीला मराठी व्हर्जन आणि आठवडाभरात बंगाली व्हर्जन रिलीज होईल.”
अंगाईच्या चित्रीकरणाविषयी बोलताना सावनी सांगते, “मी प्रेग्नेंट असताना आशिष आणि मी काही शॉट्स चित्रीत करून ठेवले होते आणि प्रेग्नंसी नंतर मी आणि आशिषने शार्वीसोबत काही शॉट्स चित्रीत केले. माझ्यासाठी ते क्षण खूप अमूल्य आहेत. या व्हिडिओचे दिग्दर्शन पियुष कुलकर्णी आणि त्यांच्या टिमने अगदी उत्तमरित्या केले. नवव्या महिन्यात गायलेली स्पेशल अंगाई तुम्हा सगळ्यांच्या भेटीला घेऊन येताना मला अपरिमित आनंद होतोय. दरवेळेस प्रत्येक गाणी माझ्यासाठी स्पेशल असतात. पण, हे गाणं मी आशिष आणि शार्वी आम्हा तिघांसाठी कायम आठवणीत राहील. मी आशा करते की, तुम्हा सगळ्यांना ही अंगाई नक्की आवडेल.”
संबंधित बातम्या :
- Nitish Bharadwaj Divorce : महाभारतातील कृष्ण Nitish Bharadwaj चा झाला घटस्फोट, म्हणाला घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल
- Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा मुहूर्त ठरला, पोस्टर शेअर करत जाहीर केली रिलीज डेट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha