‘लागिरं झालं जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन
लागीरं झालं जी' या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडं, मुलगी असा परिवार आहे.
मुंबई : 'लागीरं झालं जी' या मालिकेत जिजी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलगा सुनिल याच्याकडे बंगळुरू येथे राहण्यास गेल्या होत्या. काल शनिवारी 14 नोव्हेंबरला बंगळुरू या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेत्रीसह माजी मुख्याध्यापिका अशी देखील कमल ठोके यांची ओळख होती.
'लागीरं झालं जी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. याच मालिकेमधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. जीजी यांचे निधन झाल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके यांची ओळख आहे. त्यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
श्रीमती कमल ठोके यांचा प्रवास
कमल ठोके यांनी शिक्षकी पेशा सांभाळात अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी छप उमटवली. 1992 साली चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला, पण कराडसारख्या ठिकाणी राहून आणि शिक्षकाची नोकरी करून ते काम करणे अवघड होते. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रपट क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवले.
बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, ना. मुख्यमंत्री गावडे, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. लागिरं झालं जी या मालिकेतून त्या घराघरात पोहचल्या होत्या. जिजी या नावानेच त्या परिचितही झाल्या होत्या. देवमाणूस या मालिकेतही त्या काम करत होत्या.