मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील क्विज शो 'कौन बनेगा करोडपती'च्या 12 व्या सीझनमधील पहिला करोडपती स्पर्धक कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. अशातच या सीझनमधील शोचा पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. स्पर्धक नाजिया नसीम या सीझनच्या पहिल्या करोडपती बनल्या आहेत. दरम्यान, अद्याप हा एपिसोड टेलिकास्ट झालेला नाही. शोचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नाजियाने एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमिताभ बच्चनही आनंदाने नाजियाने दिलेलं उत्तर योग्य असल्याचं सांगताना दिसत आहेत. त्यामुळे नाजिया या सीझनमधील पहिली करोडपती बनल्या आहेत. याआधी अनेक स्पर्धक एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले, पण कोणीच या सीझनमध्ये एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकलं नाही.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, अमिताभ, नाजिया यांच्यासमोर सात कोटी रुपयांचा जॅखपॉट प्रश्नही ठेवणार आहेत. जर नाजिया यांनी या प्रश्नाचंही योग्य उत्तर दिलं, तर त्या इतिहास रचणार आहेत. त्यामुळे नाजिया यांना सात कोटी रुपयांसाठी कोणता प्रश्न विचारण्यात येतो आणि त्या या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सोशल मीडियावर केबीसीचा हा प्रोमो वेगाने व्हायरल होत आहे. प्रेक्षक हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा स्पेशल एपिसोड 11 नोव्हेंबर रोजी 9 वाजता टेलिकास्ट करण्यात येणार आहे. जर कौन बनेगा करोडपतीच्या 12व्या सीझनबाबत बोलायचे झाले तर नाजिया यांच्याआधी छवि कुमार यांनीही एक कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. पण त्यांनी एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर खेळ थांबवला होता. त्या 50 लाख रुपये घरी घेऊन गेल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या :
- अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात भाजप आमदाराकडून तक्रार, केबीसीतील प्रश्नात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
- 14 वर्षाची असताना माझ्यावर लैगिंक अत्याचार झाले, आमिर खानच्या मुलीचा गौप्यस्फोट
- सहकलाकाराने शिवीगाळ केल्यानेच मालिका सोडली, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं स्पष्टीकरण
- 'आई माझी काळूबाई'मध्ये मोठा बदल, प्राजक्ता गायकवाडची जागा वीणा जगताप घेणार!