मुंबई : लॉकडाऊननंतर नव्या मालिका सुरु झाल्या आणि घराघरांत असलेल्या प्रेक्षकांना मनोरंजनाचा नवा खजिना खुला झाला. नव्या मालिका येत असल्या तरी या सगळ्या नव्या मालिकावाल्यांना न्यू नॉर्मलला सामोरं जावं लागलं. अनेक नव्या मालिका आल्या त्यात होती 'आई माझी काळूबाई' ही मालिका. या मालिकेला कोरोनाकाळात अनेक अडचणींचा समना करावा लागला. याच सेटवर कोरोनाही पसरला होता. पण आता आणखी एक मोठा बदल मालिकेत होतो आहे. या मालिकेत आर्या साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडची जागा आता 'बिग बॉस 2' फेम अभिनेत्री वीणा जगताप घेत आहे. प्राजक्ताने मालिका सोडण्यालाही वादाची किनार आहे.


गेल्या तीन महिन्यांपासून मालिकेचं चित्रीकरण साताऱ्याजवळ सुरु झालं आहे. यात आर्या ही महत्त्वाची मुख्य व्यक्तिरेखा प्राजक्ता गायकवाड साकारत होती. प्राजक्ता यापूर्वी संभाजीराजांवरच्या मालिकेत झळकली होती. तिची ती भूमिका बरीच नावाजली गेली. म्हणून 'आई माझी काळूबाई' या मालिकेतल्या आर्या या मुख्य भूमिकेसाठी प्राजक्ताची निवड झाली. पण तीन महिने उलटतात न उलटतात तोच प्राजक्ताच्या वर्तणुकीचा फटका मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांना बसू लागला. ही मालिका आणि प्राजक्ता यांच्यात वारंवार होणाऱ्या वादाचं पर्यवसान तिने मालिका सोडण्यात झालं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता प्राजक्ताने एका दिवसात मालिका सोडली. डेली सोपचा पसारा, एकूण चालू असलेलं कथानक पाहता असा निर्णय कोणी कलाकार घेत नाही. पण या तिच्या वर्तनाने सोनी मराठी चॅनलचे पदाधिकारी आणि निर्माते नाराज आहेतच. पण त्यातूनही त्यांनी शो मस्ट गो ऑन चा नारा देत आर्या भूमिकेसाठी वीणा जगतापला राजी केलं आहे. वीणाही ताातडीने साताऱ्याला आली असून चित्रीकरणाला तिने सुरुवातही केली आहे.



याबद्दल बोलताना मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, "गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण युनिट सातत्याने तिच्या आडमुठ्या वागण्याला सहन करत होतं. आजवर तिच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. तिच्या खोलीत गेल्यानंतर चार-चार तास बाहेर न येणं. सीन लागून सर्व कलाकार तयार असूनही सर्वांना वाट बघायला लावणं आणि चित्रीकरणासाठी तारीख देऊनही बाहेरच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं. याला सुपारी म्हटलं जातं. वारंवार हे प्रकार होऊ लागल्यामुळे चित्रीकरणाचं नियोजन गडबडून जायचं. सेटवर शरद पोंक्षे, संग्राम साळवी, अनिकेत केळकर आदी अनेक कलाकार आहेत. यापैकी कुणालाही तुम्ही याबद्दल विचारु शकता. सेटवरच्याच एक ज्येष्ठ कलाकारानेही मला तिच्याबद्दल सुरुवातीला ताकीद दिली होती, तरीही मी तिच्यावर विश्वास दाखवला पण तिने आपल्या वर्तनाने सगळ्यांनाच निराश केलं आहे. '


याबद्दल सेटवर माहिती घेतल्यानंतर तिच्या वागण्याबद्दल दुजोरा मिळाला. तिच्या अशा उर्मट वर्तनाबद्दल तिला विचारलं तर मला मालिकेतून काढून टाका हवं तर असं सांगत असे. तिला दिलेला कॉश्च्युम परिधान करण्यापासून इतर अनेक बाबतीत आक्षेप असायचे. मालिकेत अशा पद्धतीचं वर्तन सहसा चालत नाही असं बोललं जातं आहे. कलाकाराला घेतानाच त्याच्याबद्दल काही नियम अटींबद्दल करारपत्र केलं जातं. त्याबद्दल कुबल यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "ही मालिका लॉकडाऊन काळात सुरू झाली. त्यामुळे करारासाठी आवश्यक गोष्टी मिळत नव्हत्या. त्यामुळे करार करायचा राहिला. अर्थात तिने काम करण्याबाबत ई-मेल झाले आहेत. 18 जुलैच्या ई-मेलला तिने ऑगस्टमध्ये उत्तर दिलं होतं. शिवाय, मालिका सुरु झाल्यावर आधी कोरोना मग आशाताईंचं जाणं. त्यांनतर पाऊस अशा अडचणीतून या मालिकेने मार्ग काढले. त्यात ही गोष्ट मागे पडली. पण आता त्याची निकड जाणवू लागली होती.


प्राजक्ताच्या एक्झिटनंतर सोनी मराठीने तातडीने वीणा जगताप हे नाव निर्मात्यांना सुचवलं. वीणानेही याला होकार दिला आहे. त्यामुळे आता या मालिकेत वीणा दिसेल. प्राजक्ताच्या अनुभवातून बोध घेत आता करारपत्र करण्यावर भर दिला जाईल यात शंका नाही. "प्राजक्ताच्या जाण्याने मालिकेच्या सेटवरची अखेरची नकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे. आता आई काळूबाई सगळं योग्य करेल, अशी आशा अलका कुबल यांनी व्यक्त केली.