मुंबई : 'आई माझी काळूबाई' ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. पण सोमवारी (2 नोव्हेंबर) ही मालिका पुन्हा चर्चेत आली ती या मालिकेतली आर्या फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या एक्झिटच्या बातमीमुळे. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप ही भूमिका साकारणार आहे. प्राजक्ताने अचानक ही मालिका सोडण्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असतानाच या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनीही प्राजक्ताबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. आता त्यावर प्राजक्ताने आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं आहे. 'काळूबाई'च्या सेटवर आपल्याला शिवीगाळ झाल्यानेच आपण ही मालिका सोडली असं तिने सांगितलं आहे.


'आई माझी काळूबाई' ही मालिका सोडण्याबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली, "ही मालिका मी सोडली आहे. अनेक ठिकाणी या मालिकेतून मला काढल्याची चर्चा होते आहे जी निखालस चुकीची आहे. शिवाय, ही मालिका सोडताना मी ती एका दिवसात सोडल्याचाही प्रचार होतो आहे जो चूक आहे. मी मालिका सोडणार हे निर्मात्या अलका कुबल यांना मी सहा दिवस आधीच सांगितलं होतं. 31 ऑक्टोबर ही माझ्या चित्रिकरणाचा शेवटचा दिवस असणार आहे हे मी कळवलं होतं. चॅनलच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसरलाही त्याची कल्पना होती. त्यानंतर ठरल्या तारखेला मी मालिका सोडली आहे. शिवाय, मला माझ्या सहकलाकाराकडून शिवीगाळ झाल्यानेच ही मालिका मी सोडली आहे.


'आई माझी काळूबाई'मध्ये मोठा बदल, प्राजक्ता गायकवाडची जागा वीणा जगताप घेणार!


शिवीगाळ कुणी आणि कधी केली याबद्दल प्राजक्ताने विवेक सांगळे या कलाकाराचं नाव घेतलं आहे. ती म्हणाली, 'आशालता वाबगावकर यांच्या निधनानंतर मुख्य कलाकारांना घेऊन या मालिकेचं चित्रीकरण मुंबईत फिल्मसिटीत करायचं ठरलं होतं. त्यामुळे एका गाडीतून मी, माझी आई, विवेक आणि ड्रायव्हर असे निघणार होतो. त्यावेळी बोलताना विवेकने आपण अनेक कोरोना पेशंट्सना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं. साहजिकच, विवेकसोबत प्रवास करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण त्यावेळी आपण सगळेच काळजी घेत होतो. सेटवरही आधीच एका ज्येष्ठ कलाकाराचा मृत्यू ओढवला होता. त्यामुळे मी त्या गाडीतून येण्यास नकार दिला. त्यानंतर विवेकने थेट मला असभ्य भाषेत बोलायला सुरुवात केली. शिवीगाळही केली. इतकं झाल्यानंतरही मालिका चालू राहावी म्हणून मी चित्रीकरण सुरु केलं. पण सहकलाकार म्हणून त्याच्यासोबतचे सीन करताना माझ्यासोबत त्याने केलेली शिवीगाळ मला सतावू लागली आणि मग मी मालिका सोडायचा निर्णय घेतला. याची रीतसर कल्पना आणि तारीख मी निर्मात्यांना कळवली होती."


"खंरतर मालिका सोडण्याबद्दल आणि शिवीगाळ झाल्याबद्दल मला काहीच जाहीर बोलायचं नव्हतं. पण निर्मात्या कुबल यांनी अचानक सगळीकडे माझ्याबद्दल चुकीची माहीती द्यायला सुरुवात केली. म्हणून मला माझी बाजू मांडावी लागली. कुबल बोलताना, मी सुपारी घेण्याबद्दलही बोलल्या. पण लॉकडाऊनच्या काळात कुणीही सांगावं, कोणते जाहीर इव्हेंट झाले? कार्यक्रमच नव्हते, त्यामुळे मी सुपारी घ्यायचा प्रश्नच नाही. माझ्या परीक्षेबद्दलही मी निर्मात्यांना आधीच कल्पना दिली होती. मला मालिकाच करायची नसती तर मी कधीच ती सोडली असती. ही माझी काही पहिला मालिका नाही. यापूर्वी येसूबाई साकारतानाही मी पुरेपूर मेहनत घेतली होती. इथेही मी चार चार तास खोलीतून बाहेर येण्याबद्दल बोललं जातंय, पण इथे हिंगणगावला आम्ही सगळे एकाच वाड्यात राहतो. माझ्या खोलीतही वसुंधरा आजी राहातात. इतका वेळ मी लावायचा प्रश्नच येत नाही," असं प्राजक्ताने सांगितलं.


विवेकने शिवीगाळ केल्याबद्दल अलका कुबल यांना विचारलं असता त्या विवेकची बाजू घेतात. त्या म्हणतात, "विवेक चांगला मुलगा आहे. त्याने अनेक कोरोना रुग्णांना मदत केली आहे. प्राजक्ता, तिची आई सोबत असताना तो फोनवर तिसऱ्याच माणसाला संतापाच्या भरात काही सुनावत होता. तशी त्याने शिवीगाळ आमच्यासमोर करायला नको होती असा प्राजक्ताचं म्हणणं होतं. आता प्राजक्ता हा मुद्दा वळवून विवेक आपल्यालाच शिव्या देत होता असं म्हणू लागली आहे." त्याचवेळी प्राजक्ता मात्र याचा साफ इन्कार करते. मुंबईला त्या गाडीतून जायलाा नकार दिल्यानंतर विवेकने आपला पाणउतारा करत शिवीगाळ केली असं ती स्पष्ट करते.