मुंबई : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या 12व्या सीझनच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. परंतु, सध्या टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय शो असलेला 'कौन बनेगा करोडपती' आणि या शोचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन अडचणीत सापडले आहेत. शोमध्ये एका स्पर्धकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरातून अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपती विरोधात टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रातही अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात भाजप आमदाराने लेखी तक्रार दाखल केली आहे. अमिताभ बच्चन यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलाय. अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिसांत यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे.
पाहा व्हिडीओ : आमदार अभिमन्यू पवार यांची अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात तक्रार, KBC मधील प्रश्नावर आक्षेप
अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, 'सोनी टीव्हीवर प्रसारित होण्यासाठी केबीसी कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारला होता. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी यापैकी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या?यासाठी स्पर्धकाला चार पर्याय दिले होते. 1. विष्णु पुराण 2. भगवद्गीता 3.ऋग्वेद 4. मनुस्मृति, हे चार पर्याय हिंदू धर्माशी संबंधित धर्मग्रंथांचे होते. जर त्यांचा हेतू बरोबर असेल तर त्यांनी चार पर्यायांमध्ये भिन्न धार्मिक ग्रंथांची नावे दिली असती. परंतु त्या पर्यायांत फक्त हिंदू धार्मिक ग्रंथांचा उल्लेख करण्यात आला होता. असं करून अमिताभ बच्चन यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीने हिंदू आणि बौद्ध यांच्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे तक्रारदार अभिमन्यू पवार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे आहेत. त्यांनी लातूर पोलिसांनी ही लेखी तक्रार दाख केली असून पोलिसांनी ती मान्यही केली आहे. परंतु अद्याप या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 14 वर्षाची असताना माझ्यावर लैगिंक अत्याचार झाले, आमिर खानच्या मुलीचा गौप्यस्फोट
- सहकलाकाराने शिवीगाळ केल्यानेच मालिका सोडली, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं स्पष्टीकरण
- 'आई माझी काळूबाई'मध्ये मोठा बदल, प्राजक्ता गायकवाडची जागा वीणा जगताप घेणार!
- '...तर मी त्याला तुरुंगात टाकेन' ; कंगना रनौतचा प्रसिद्ध यू-ट्यूबर ध्रुव राठीला इशारा