(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jui Gadkari: मुलं होत नाही म्हणून मातृत्व नाही का? जुई गडकरीचा रोखठोक सवाल
Jui Gadkari : आजारपणातील आव्हानात्मक काळाला मागे सारत जुईने छोट्या पडद्यावर पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. लग्न, मातृत्व याबाबतच्या प्रश्नांना तिने एका मुलाखतीत सडेतोड उत्तरे दिली आहेत.
Jui Gadkari : छोट्या पडद्यावर आपल्या पदार्पणापासून लोकप्रिय झालेली अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' या मालिकेतून पुन्हा घराघरात पोहचली आहे. जुई गडकरीने मध्यंतरी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आजारपणातील आव्हानात्मक काळाला मागे सारत जुईने छोट्या पडद्यावर पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. लग्न, मातृत्व याबाबतच्या प्रश्नांना तिने सडेतोड उत्तरे दिली आहेत. वेळेत लग्न, वेळेत मुलं ही गोष्ट जुन्या काळी योग्य होतं. पण, आता हे शक्य नाही असेही तिने म्हटले. ज्यांना मुलं नाहीत याचा अर्थ त्या स्त्रियांकडे मातृत्व नाही का असा थेट प्रश्न तिने केला.
अभिनेत्री जुई गडकरीने लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत आपले आजारपण, त्या काळातील मानसिक स्थिती, लग्न आदी मु्द्यांवर भाष्य केले. जुईने आपल्या आजारपणाविषयी बोलताना सांगितले की, त्याकाळात मी माझ्या पायावर उभी राहिल की नाही याची चिंता होती. आपण नकारात्मक असलो की त्याचा परिणाम शरिरावर होतो. त्यामुळे मी सकारात्मक विचार करत गेले.आपण आयुष्यात काय सकारात्मक केले आहे, याचा विचार करणे चांगले असल्याचे तिने म्हटले. माझ्यासोबत माझे कुटुंबीय उभे राहिले. ज्यावेळी कुटुंबीय तुमच्यासोबत असतात त्यावेळी इतर लोक काय बोलतात त्याचा परिणाम होत नसतो असेही तिने म्हटले.
त्या स्त्रियांकडे मातृत्व नाही का?
जुई गडकरीने मातृत्वाबाबत म्हटले की, आपल्याकडे मानलं जातं की, स्त्री पूर्ण तेव्हाच होते जेव्हा तिला मुलबाळ होतं. मग त्या स्त्रियांनी काय करावं ज्यांना मुलं होत नाहीत? ती स्त्री नाहीय का? तिच्यात मातृत्व नाहीय का? तर तसं काहीच नसल्याचे तिने म्हटले. आजारपणामुळे जुई आई होणार नसल्याचे तिला डॉक्टरांनी सांगितले होते.
लग्नाबाबत जुईने काय म्हटले?
जुई गडकरीने लग्नाबाबतही भाष्य केले. लग्न नाही झाले याची चिंताही होती. पण एका मर्यादेनंतर फार विचार केला नाही. सकारात्मक विचार ठेवला. जे होईल ते देवाच्या मर्जीने होईल. सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यक आहे असेही तिने म्हटले. आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या माझ्या इच्छेने घडल्या नाहीत. त्या देवाच्या इच्छेने घडल्या. त्यामुळे माझा देवावर विश्वास असून आणखी चांगले होईल असेही तिने म्हटले.
जुन्या काळात योग्य वयात लग्न पण...
जुई गडकरीने आपल्या मुलाखतीत म्हटले की, वेळेत लग्न, वेळेत मुलं ही गोष्ट जुन्या काळी योग्य होतं. पण तो काळ वेगळा होता. आताच्या वेळी या गोष्टी करणे शक्य नाही. सध्याच्या काळात मुलीच नाही तर मुलांनादेखील ताण आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली अशा गोष्टींमुळे मुलगा-मुलगी दोघांमध्ये इनफर्टिलीटी वाढणं कठीण झाले असून याचा मोठा दबाव मुलींवर अधिक असल्याचे तिने सांगितले.