Jai Jai Shani Dev : 'जय जय शनिदेव' मालिकेतील कलाकार शनी शिंगणापूरात शनिदेवाच्या दर्शनाला
Jai Jai Shani Dev : 'जय जय शनिदेव' मालिकेच्या कलाकारांनी शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले आहे.

Jai Jai Shani Dev : प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवे कार्यक्रम सुरू होत आहेत. पौराणिक, ऐतिहासिक, थरारक अशा विविध धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. अशातच आता सोनी मराठी वाहिनीवर 'जय जय शनिदेव' (Jai Jai Shani Dev) ही नवी मालिका सुरू होणार आहे. मालिका 8 मेपासून सुरू होणार आहे. मालिका सुरू होण्याआधी मालिकेतील कलाकारांनी शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'जय जय शनिदेव' ही मालिका जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांच्यावर आधारित आहे. मालिकेच्या प्रदर्शनापूर्वी मालिकेच्या कलाकारांनी आणि निर्मात्यांनी शनी शिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेतले. निर्माते आणि लेखक संतोष अयाचित आणि शनिदेवांच्या भूमिकेत असलेले संकेत खेडकर हे सहभागी झाले. यांनी शनी शिंगणापूर येथे दर्शन घेतले आणि मालिकेनिमित्त छोटेसे हवन देखील केले. त्या नंतर कलाकारांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली. या वेळी श्री शनेश्वर देवस्थान शनि शिंगणापूर यांचा मोठा हातभार लाभला. त्याशिवाय अध्यक्ष भागवत सोपान बानकर, उपाध्यक्ष विकास नानासाहेब बानकर, सरचिटणीस बाळासाहेब बोर्डे, चिटणीस आबासाहेब शेटे मा. आ. शंकरराव गडाख, नितीन शेटे हे देखील उपस्थित होते. यांचे मालिकेच्या टीमने विशेष आभार व्यक्त केले.
'जय जय शनिदेव' मालिकेच्या कलाकारांनी घेतले शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन
अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारतो आहे. याआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेत. पण प्रमुख भूमिका म्हणून 'शनिदेव' ही संकेतची पहिलीच भूमिका आहे. विशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगरचा असून 'जय जय शनिदेव' मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी 'जय जय शनिदेव' मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे.
शनिदेव यांच्यावर आधारित मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. सूर्यपुत्र, न्यायदाते, आणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेव यांची महागाथा 8 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्याच दिवशी 1 तासाचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शनिदेवांचे निरनिराळे अध्याय या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडले जातील. विक्रमादित्य यांची गोष्ट आपल्याला मालिकेच्या सुरुवातीच्या भागांत पाहायला मिळणार आहे. शनिदेवांच्या भूमिकेत अभिनेता संकेत खेडकर दिसणार आहे तर महादेवांच्या भूमिकेत अभिनेता त्रिशुल मराठे आपले पदार्पण करत आहे. संतोष अयाचित यांच्या लेखणीच्या पेटार्यातून आणखीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यांच्या लेखणीतून 'जय जय शनिदेव' मालिकेचे लेखन होणार आहे. संतोष अयाचित हे मालिकेचे निर्मातेदेखील आहेत.
जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांचा जीवनप्रवास या मालिकेतून 8 मे पासून सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो, ते प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या
Jai Jai Shani Dev : सूर्यपुत्र, न्यायदाते आणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेवांची महागाथा; 'जय जय शनिदेव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
