Hrudayi Preet Jagate : 'हृदयी प्रीत जागते' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला; लव्ह गुरू मंदार देवस्थळी करणार दिग्दर्शन
Hrudayi Preet Jagate : 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Hrudayi Preet Jagate : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे मालिका विश्वात तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे. आजपासून 'हृदयी प्रीत जागते' (Hrudayi Preet Jagate) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत संगीतमय प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे.
'हृदयी प्रीत जागते' मालिकेचं कथानक काय?
'हृदयी प्रीत जागते' ही तरुण संगीतमय प्रेमकथा आहे. ही कथा दोन तरुणांची आहे. जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या मालिकेतील नायिका एक निस्वार्थी, प्रामाणिक आणि आज्ञाधारक आणि नम्र कुटुंबातील मुलगी आहे. तर नायक प्रचंड हुशार, मोहक मुलगा आहे आणि त्याला पाश्चिमात्य संगीताची आवड आहे. हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे.
नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थ खिरीद आणि पूजा कातुर्डे ही तरुण जोडी 'हृदयी प्रीत जागते' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. अभिजीत शेंडेने या मालिकेचं लेखन केलं आहे. तर सुपरहिट मालिका देणारे मंदार देवस्थळी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
मंदार देवस्थळी पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत
'वादळवाट', 'अवघाचि हा संसार', 'होणार सून मी या घरची', 'फुलपाखरू',' हे मन बावरे', 'मन उडू उडू झालं' अशा लोकप्रिय मालिकांसोबत कच्चा लिंबू सारख्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमाचं दिग्दर्शन केलेला मंदार देवस्थळी 'हृदयी प्रीत जागते' या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहे. गुणी आणि कल्पक दिग्दर्शक म्हणून मंदार देवस्थळीकडे पाहिलं जातं. त्यामुळे 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल.
हृदयी प्रीत जागते
कधी होणार सुरू? 7 नोव्हेंबर
कुठे पाहू शकता? झी मराठी
किती वाजता? सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता